धाराशिव – समय सारथी
उस्मानाबाद – बीड व लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूम परंडा व वाशी विधानसभा मतदारसंघातील आगामी रणनीती आणि विविध जनहिताच्या मुद्द्यांवर आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी सविस्तर आढावा बैठक घेतली. या बैठकीत मतदार संघातील जिल्हा परिषद सदस्य, सभापती, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
आगामी काळात शिवसेना पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी “गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक” हे अभियान अधिक गतीने आणि प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प करण्यात आला. अद्याप मान्सूनचे आगमन झाले नसून, ‘एल निनो’च्या प्रभावामुळे कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या गंभीर परिस्थितीची पूर्वतयारी म्हणून तालुक्यातील पूर्वतयारी, पेरणीचे नियोजन आणि पशुधनाच्या सुरक्षेबाबत सखोल चर्चा करण्यात आली. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता गरजेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आणि चारा छावण्यांचे आगाऊ नियोजन करण्याबाबत सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले.
बैठकी दरम्यान प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणनिहाय सुरू असलेल्या विकासकामांची गती तपासण्यात आली तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध प्रलंबित विकासकामांना गती देण्याचे निर्देश दिले. अनेक गावांमध्ये महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या होत्या, याची गंभीर दखल घेत संबंधित वीज अधिकाऱ्यांना तात्काळ व अखंडित वीजपुरवठा करण्याचे कडक निर्देश यावेळी देण्यात आले.
आढावा बैठकीला जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे, परंडा नगराध्यक्ष जाकीर भाई सौदागर, भूम माजी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे, भैरवनाथ शुगर वर्क्स लि.चे व्हाईस चेअरमन केशव सावंत, रामचंद्र घोगरे यांच्यासह सर्व प्रमुख शिवसेना पदाधिकारी, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, नवनिर्वाचित नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, महिला आघाडीच्या पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.












