तुळजाभवानीची आरती करून घातले साकडे, जरांगे यांनी साधला मराठा बांधवांशी संवाद
धाराशिव – समय सारथी
मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज बांधवानी धाराशिव ते तुळजापूर अशी महावाहन रॅली काढत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी आरती करुन साकडे घातले. यावेळी मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांशी फोनवरून संवाद साधला.
या रॅलीत दुचाकी, चारचाकी गाड्यासह एक मराठा, कोट मराठा, आरक्षण मिळालेच पाहिजे अश्या घोषणा देत मराठा बांधव सहभागी झाले. तुळजापूर शहरात प्रवेश करताच तुळजापूर येथील बांधवानी त्यांचे स्वागत केले. मुंबई येथील मनोज जरांगे पाटील यांसह सर्व समाज बांधवांचे आंदोलन यशस्वी व्हावे यासाठी तुळजाभवानी देवीला साकडे घातले.
धाराशिव शहरातील छत्रपती शाहू महाराज चौक तेरणा कॉलेज येथून रॅलीस सुरुवात झाली. नंतर महात्मा बसवेश्वर चौक, राजमाता जिजाऊ चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, देशपांडे स्टॅन्ड, राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक असे मार्गक्रमण करीत रॅली तुळजाभवानी मंदिर येथे गेली व तिथे देवीची आरती केली. रॅलीत महिला, पदाधिकारी व बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.