धाराशिव – समय सारथी
कृषी निविष्टासह वेतन, शेडनेट, सेवा वर्ग, सह अन्य घोटाळे व सन्मानाची ‘सेवा निवृत्ती’ पॅटर्न आणि “घोटाळा करा पैसे भरा व मुक्त व्हा” या पॅटर्ननंतर आता कळंब तालुक्यात कृषी अवजार घोटाळ्याची तक्रार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
कळंब तालका कषी अधिकारी, मंडळ कषी अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट व काही दुकानदार यांना हाताशी धरुन कृषी अवजार बँकेचे बनावट प्रस्ताव तयार करुन बोगस बिले सादर करून अपहार केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते भास्कर महादेव वारे यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे केली असुन चौकशी समिती नेमून कारवाईची मागणी केली आहे.
कळंब तालुका कृषी अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी अधिकारी यांनी शासन स्तरावरुन शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट यांच्याशी संगणमत करून अपहार केल्याचा आरोप वारे यांनी केला आहे. कृषी अवजार बँक योजनेत अनुदान घेण्यासाठी काही बोगस प्रस्ताव घेऊन कळंब येथील अवजारे विक्री करणाऱ्या दुकानदार यांना हाताशी धरुन बनावट बिले घेऊन करोडोचे अनुदान लुटले.
ज्या लाभार्थ्यानी अवजारे खरेदी केलेली आहेत त्या बिलावरील सीएमएल नंबर व सदर अवजार आज रोजी लाभार्थ्याकडे उपलब्ध आहे का या गोष्टीची तपासणी करणे गरजेचे आहे, तपासणी पुरती अवजारे शेतकऱ्यांना दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 2025-26 व 2026-2027 कालावधीमध्ये हा प्रकार घडला असुन सखोल चौकशीची मागणी केली आहे. काहींनी अवजारे विकली सुद्धा तर अवजारे निर्मिती, विक्री व वाटप या सर्व प्रक्रियाची चौकशी करावी अशी मागणी वारे यांनी केली आहे.











