धाराशिव – समय सारथी
‘जिल्हा गुंतवणूक परिषद – धाराशिव 2026’ चे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन करून मार्गदर्शन केले. धाराशिव जिल्हा हा केवळ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला जिल्हा नाही, तर कृषी, कृषीपूरक उद्योग, अन्नप्रक्रिया, अक्षय ऊर्जा, पर्यटन तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या माध्यमातून मोठी औद्योगिक झेप घेण्याची क्षमता असलेला जिल्हा आहे.
आजची ही गुंतवणूक परिषद म्हणजे केवळ उद्योगपतींची बैठक नाही. ही परिषद म्हणजे धाराशिवच्या आर्थिक परिवर्तनाची नवी सुरुवात आहे. आपल्या जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या स्थानिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून स्थानिक पातळीवर उद्योग उभे करणे, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि धाराशिवला राज्याच्या औद्योगिक नकाशावर एक महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित करणे, हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे असे पालकमंत्री म्हणाले.
परिषदेत ३७ उद्योगांसोबत तब्बल ७५३४.८५ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. या गुंतवणुकीतून ७५०० रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. या प्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे विशेष आभार मानले. ही आकडेवारी केवळ आकडे नाहीत, त्यामागे धाराशिवच्या हजारो कुटुंबांच्या आशा, तरुणांच्या रोजगाराच्या संधी आणि जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीची मोठी क्षमता दडलेली आहे.
उद्योजकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा आणि धाराशिवमध्ये आपली गुंतवणूक वाढवावी, असे आवाहन करतो. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि धाराशिव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी शासन कटिबद्ध आहे असे पालकमंत्री सरनाईक म्हणाले.











