धाराशिव – समय सारथी
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांचा 13 जानेवारी रोजीचा धाराशिव दौरा रद्द करण्यात आला असुन पुढील काही दिवसात ते धाराशिव दौऱ्यावर येतील अशी माहिती जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी दिली.
मराठा आरक्षण आंदोलन सध्या पेटलं असुन अजित पवार व मनोज जरांगे पाटील यांच्यात शाब्दिक चकमक सुरूच आहे, त्यामुळे अजित पवार यांचे 13 जानेवारी रोजी धाराशिव व परभणी येथे होणारे दौरे, सभा, मेळावा रद्द करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. मराठा आरक्षण मुद्दा व आंदोलन यामुळे राष्ट्रवादी व पवारांनी तूर्तास सावध पवित्रा घेतल्याचे बोलले जात आहे.
अजित पवार हे धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी बैठक व मेळावा घेणार होते यासाठी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी आढावा बैठक घेऊन मेळाव्याची संपुर्ण तयारी केली होती मात्र अचानक हा दौरा रद्द करण्यात आला आहे.
10 जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धाराशिव दौरा होता तो रद्द झाला त्या पाठोपाठ आता 13 जानेवारीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही दौरा रद्द झाला आहे.