धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर पै समद काझी दुहेरी हत्याकांडात आज सोमवारी आरोपी डॉ पद्मसिंह पाटील यांच्या बाजुने त्यांचे वकिलांनी युक्तिवाद केला. 27 जानेवारी पर्यंत अंतीम युक्तिवाद पुर्ण करण्यात येणार असल्याने युक्तिवाद संपेपर्यंत दररोज या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सरकारी व आरोपी पक्षाचे साक्ष, पुरावे संपले असुन हे प्रकरण सुनावणीच्या अंतीम टप्प्यात आहे. मुंबईचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए ए जोगळेकर यांच्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. आरोपीच्या वतीने वकिलांनी त्यांची बाजु कोर्टात मांडली.
राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पदमसिंह पाटील यांच्यासह 9 जण या रक्तरंजित हत्याकांडात आरोपी असुन त्यात डॉ पाटील यांना सीबीआयने हत्या, कट रचणे यात मुख्य आरोपी केले आहे, आनंदीदेवी राजेनिंबाळकर ह्या फिर्यादी आहेत. पारसमल जैन या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनला झाला असुन समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 128 साक्षीदार यांची साक्ष झाली आहे. डॉ पाटील यांच्या वतीने 20 साक्षीदार तपासण्यासाठी यादी दिली होती मात्र कोर्टाने आदेशाने 2 साक्षीदार तपासले. माजी खासदार डॉ पदमसिंह पाटील यांच्यासह मुंबई येथील नगरसेवक मोहन शुक्ला,उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव,माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी,लातूर येथील सतीश मंदाडे,पारसमल जैन,शुटर दिनेश तिवारी,पिंटू सिंग व छोटू पांडे हे संशयीत आरोपी आहेत. शूटर दिनेश तिवारी व पिंटू सिंग हे दोघे अजुनही जेलमध्ये असुन डॉ पाटील, जैनसह इतर सर्व आरोपी जामीनावर आहेत.
डॉ पाटील हे प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत अनेक वेळा सुनावणीसाठी गैरहजर राहत असल्याने सुनावणी पुढे ढकलली गेली, त्यावर आक्षेप घेत लवकर सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार देखील ठोठवावे लागले, तेव्हा याला गती आली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे अशी मागणी खासदार ओमराजे यांनी तत्कालीन गृहमंत्री अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती तर जनआक्रोश मोर्चात पवनराजे हत्या प्रकरणी गेली 18 वर्षापासुन न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती. 4 जुलै 2011 पासुन सुमारे साडे 13 वर्षापासुन या दुहेरी खुन खटल्याची सुनावणी सुरु आहे, जी आता अंतीम टप्प्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने 2013 मध्ये हा खटला अलीबागवरून मुंबई सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे.
3 जून 2006 ला पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर समद काझी हे मुंबईवरून धाराशिवकडे पांढऱ्या रंगाच्या स्कोडा गाडीने येत असताना नवी मुंबई कळंबोली येथे दिवसा ढवळ्या गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. पवनराजे हे झोपलेले असताना त्यांची गाडी हात दाखवुन थांबवण्यात आली त्यानंतर ड्राईव्हरने काच खाली घेताच गोळ्या झाडण्यात आल्या. बंदूक फेकून दिल्यानंतर आरोपीनी इंडिका गाडी पनवेलच्या बेलवली जवळ सोडून दिली. हत्याकांडाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र पोलीस त्यानंतर, सीआयडीने केला मात्र त्यात फारसे काही निष्पन्न झाले नाही. पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी यांनी या खुनाचा तपास सीबीआयने करावा अशी फौजदारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने 23 ऑक्टोबर 2008 रोजी तपास सीबीआयकडे देण्यात आला.
मुंबई क्राईम ब्रांचचे तत्कालीन पोलीस सहआयुक्त राकेश मारिया यांच्या टीमला खबऱ्यामार्फत माहिती मिळाली, की जैनने मोठे काम केले आहे. 25 फेब्रुवारी 2009 ला एकेकाळी सोने व्यापारी व अनेक दरोड्याचे गुन्हे नोंद असलेल्या जैनला अटक करण्यात आली, त्याने कबुली दिली. त्यानंतर डॉ पदमसिंह पाटील यांना पवनराजे हत्याकांड प्रकरणी सीबीआयने अटक केली. खुन घटनेनंतर तब्बल 3 वर्षांनी 6 जुन 2009 रोजी मुंबई येथून सीबीआयचे तत्कालीन जॉईंट डायरेक्टर ऋषीराज सिंग, पोलीस अधीक्षक तथा आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकुर यांनी डॉ पाटील यांना अटक केली, त्यानंतर 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. डॉ पाटील यांच्या धाराशिव व मुंबई येथील घरावर सीबीआयने छापेमारी केली त्यात शस्त्रसाठा व अनेक आक्षेपहार्य बाबी सापडल्या. राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रवक्ते प्रफुल्ल पटेल व डी पी त्रिपाठी यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी 10 जुन 2009 रोजी डॉ पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा केली. 20 ऑगस्ट 2009 रोजी सीबीआयने डॉ पाटील यांच्यासह 9 जणांच्या विरोधात कोर्टात 5 हजार पानाचे चार्जशीट कोर्टात सादर केले त्यात पवनराजे यांची हत्या राजकीय वर्चस्वातुन झाल्याचा ठपका ठेवला. 25 सप्टेंबर 2009 रोजी अलिबाग कोर्टाने डॉ पाटील यांना 2 लाख रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला.
आरोपी पारसमल जैन तुरुंगात असताना त्याची मुलगी वर्षा भेटायला गेली, वडिलांनी सांगितल्या प्रमाणे तिने सीबीआयच्या अधिकार्यांना 27 एप्रिल 2009 रोजी एक लेखी पत्र लिहून त्यात पवनराजे हत्याकांडाचा खुलासा केला. त्यानंतर जैन याने न्यायालयात दिलेल्या जबाबात माजी गृहमंत्री पदमसिंह पाटील यांनी सतीश मंदाडे मार्फत पवनराजे व समाजसेवक अण्णा हजारे यांची हत्या करण्यासाठी 30 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे कबूल केले. हजारे यांनी त्यानंतर डॉ पाटील यांच्यासह 4 जणा विरोधात तक्रार देत हत्येची सुपारी दिल्याचा व कट रचल्याचा स्वतंत्र गुन्हा लातुर एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद केला. पारसमल जैन याने 25 सप्टेंबर 2009 रोजी न्यायाधीश एस बी महाले यांच्या कोर्टात 164 अंतर्गत जबाब दिला, त्याच आधारावर डॉ पाटील यांना अटक करण्यात आली.
माझी आर्थिक स्तिथी बिकट असल्याने स्तिथी मी माझा मित्र मोहन शुक्ला यांना सांगितली. जानेवारीमध्ये मी शुक्ला याच्या घरी गेलो त्यावेळी त्याने मला 50 हजार रुपयांची मदत केली व म्हणाला पारस कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है. तू एक काम कर मेरे मित्र सतीश मंदाडे के पास लातूर जाकर उनसे मिल. उनका एक काम है, डॉ पदमसिंह पाटील पवनराजे निंबाळकर से परेशान है.उनकी हत्या का काम तू कर दे तो तुझे अच्छा खासा पैसा मिल जायेगा.मंदाडेने बताया डॉक्टर पदमसिंह पाटील साखर घोटाले के कारण बहोत परेशान है. इसलिये पहले पवनराजे का खून करने का उसके बादमे अण्णा हजारे का खून का काम भी तुम्हे दे देंगे.तो मैने उनको कहा कि मै पवनराजे साहब का काम कर दूंगा लेकिन अण्णा हजारे का काम नहीं कर पाऊंगा.तो मंदाडे ने काही ठीक है पवनराजे का करो. तो मैने पवनराजे को मारा.
2004 साली पवनराजे यांनी डॉ पाटील यांच्या विरोधात विधानसभा निवडणुक अपक्ष उमेदवारी लढवली होती, त्यात डॉ पाटील हे अवघ्या 484 मतांनी विजयी झाले, त्यावेळी “पवनराजे यांचा डॉ पद्मसिंह पाटील यांना पाठिंबा” अशी बातमी ऐन मतदानाच्या दिवशी एका वृत्तपत्रात प्रकाशित करुन त्याचे अंक वाटप करण्यात आल्याने संभ्रम व गोंधळ उडाला होता. विधानसभा निकालानंतर तेरणा ट्रस्ट व तेरणा साखर घोटाळा आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते, पवनराजे यांनी तेरणा ट्रस्ट मालकी बाबत कोर्टात प्रकरण दाखल केले. 2006 साली पवनराजे निंबाळकर यांचा खुन झाला, त्यांच्या हत्यानंतर 13 व्या दिवशी तक्रारदार हयात नसल्याचे कारण देत हे प्रकरण कोर्टात बंद करण्यात आले. अण्णा हजारे यांनी डॉ पाटील यांच्यावर साखर घोटाळा व इतर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यात डॉ पाटील हे न्यायमूर्ती पी बी सावंत आयोगाच्या चौकशीत दोषी सापडल्याने त्यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 2014 साली अण्णा हजारे यांनी त्यांच्या टीमसह येत धाराशिव लोकसभा निवडणुकीत पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात मतदार जागृती अभियान राबविले.