धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील बोगस मतदार अर्ज नोंदणीच्या घटनेनंतर निवडणुक विभाग अलर्ट मोडवर आला असुन धाराशिव जिल्ह्यात 20 ऑक्टोबर रोजी रविवारी सर्व 4 ही विधानसभा मतदार संघातील गावात मतदार याद्याचे चावडी वाचन केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ज्या नावांची नोंदणी करण्यात आली आहे त्या सर्व नावाची व सोबत जोडलेल्या कागदपत्रे यांची पुन्हा एकदा तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत. तुळजापूर विधानसभा मतदार संघात जे अर्ज नामंजूर करण्यात आले त्या अर्जाची व सोबत जोडलेल्या कागदपत्रे यांची तपासणी करण्यात येणार असुन त्यात बोगसगिरी सापडल्यास तसे पोलीस विभागाला कळविले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
मतदार याद्याचे चावडी वाचन गावात केले जाणार असुन त्यावेळी काही आक्षेप आले तर त्याची सुनावणी घेऊन नावे मतदार यादीतून कमी करण्यात येणार आहेत. चावडी वाचन वेळी गावात लोकांनी, राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी यांनी हजर राहावे व काही आक्षेप असल्यास नोंदवावेत. कुठे बोगस अर्ज नोंदणी किंवा मतदार नोंदणी झाल्याची माहिती, तक्रार असल्यास लेखी तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी केले आहे.
तुळजापूर विधानसभा मतदार संघात बोगस नव मतदार अर्ज नोंदणी प्रकरणात 40 जणांवर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशानंतर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सायबर पोलिसात गुन्हा नोंद करुन तो तुळजापूर पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे.
मतदार नोंदणी करताना काही अर्जदार यांच्या अर्जासोबत जोडलेल्या आधार कार्डमध्ये नामांकन क्रम म्हणजे इनरॉलमेंट क्रमांक हा एकसारखाच आढळुन आला तसेच आधार कार्डवर डिजीटल सहीमध्ये दिनांक व वेळ एकसमान असल्याचे आढळून आले आहे. मोबाईल धारकांनी बनावट मतदार म्हणुन मतदार यादीमध्ये नांव समाविष्ट करण्यासाठी बनावट आधार कार्ड बनविले. भारत निवडणुक आयोगाचे व्होटर हेल्पलाईन नावाचे मोबाईल ॲपव्दारे लॉग ईन करून ऑनलाईन बनावट कागदपत्र सादर करून भारत निवडणुक आयोगाची फसवणुक केली अशी तक्रार तहसीलदार तथा सहायक मतदान नोंदणी अधिकारी अरविंद शंकरराव बोळंगे यांनी दिली. भारतीय न्याय संहिताचे कलम 172,3(5),318(2),335,336(2)(3),340(2),61(2),62 अन्वये सायबर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 2 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर या दरम्यान गुन्हा घडला आहे.
बोगस आधार कार्ड, रहिवासी दाखले, मोबाईल नंबर, फोटो व इतर कागदपत्रे वापरून तुळजापूर विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात फॉर्म 6 भरून अर्जाची नोंदणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे त्या गावचे नागरिक नसुन त्यांना गावात कोणीही ओळखत नाही. फॉर्म 6 भरताना त्यांनी स्थानिक नागरिक असल्याचे काही पुरावे जोडले आहेत ते ही बोगस आहेत. अमोल शिवाजीराव जाधव यांनी निवडणुक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्याकडे तक्रार केली होती.
आरोही उमेश सगाटे, नीलिमा शेखर रबाळे,शैलेश किशोर सालगे, तुषार पंकज इनागटे यासह 50 जणांच्या नावे फॉर्म 6 ( नवीन मतदार नोंदणी ) हंगरगा नळ या गावात मतदार नोंदणीसाठी अर्ज भरला आहे. अर्ज भरताना जे आधार कार्ड जोडण्यात आले ते नंबर व कार्ड अस्तित्वात नसुन त्याचा इनरॉलमेंट नंबर व वेळ एकच आहे त्याचा अर्थ हे सगळे बोगस कार्ड आहेत. त्यांचे वय व फोटो या इतर बाबी पाहता त्या कुठेही जुळत नाहीत. ज्येष्ठ नागरिक, महिला, कॉलेज विद्यार्थी यांच्या नावाने बोगस आधार कार्ड, मोबाईल नंबर, फोटो व इतर कागदपत्रे वापरून अर्ज करण्यात आले आहेत.काही विद्यार्थी यांचे फोटो हे मेडिकल ऍप्रॉन, सुट घालुन आहेत तर ज्येष्ठ नागरिक यांचे फोटो आहेत पण आधार कार्डवर त्यांचे वय 30-40 वर्षाच्या आत आहे.