एका आरोपी हजर होईना, लातुर कोर्टाचे अटक वॉरंट जारी
धाराशिव – समय सारथी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी व कट रचल्याच्या प्रकरणात लातुर कोर्टात तारीख पे तारीख असा सिलसिला सुरु आहे. 2009 साली गुन्हा नोंद झाल्यानंतर तब्बल 10 वर्षाने सीआयडीने राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, मोहन अनंत शुक्ला व सतीश रानबा मंदाडे या 3 आरोपी विरोधात लातुर कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. 2022 पासुन या प्रकरणात चार्ज फ्रेम ( आरोप निश्चिती प्रक्रिया ) न झाल्याने प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झालेली नाही. डॉ पद्मसिंह पाटील व शुक्ला हे वेगवेगळी कारणे देऊन सुनावणीस गैरहजर राहत हजेरी माफिचा अर्ज देत आहेत तर मंदाडे याच्या विरोधात कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे मात्र तो गेली दीड वर्षापासुन पोलिसांना सापडेना झाला आहे. एकंदरीत हे प्रकरण पवनराजे हत्याकांडसारखेच आरोपीकडुन प्रलंबित ठेवले जात आहे. अण्णा हजारे हत्या सुपारी प्रकरणाची पुढील सुनावणी 25 फेब्रुवारी 2025 रोजी लातुर येथील कोर्टात होणार आहे. ऍड मोहन जाधव हे तिघांच्या वतीने कोर्टात वकील आहेत. डॉ पाटील, शुक्ला व मंदाडे हे तिघेही पवनराजे हत्याकांडात आरोपी असुन त्याचं गुन्ह्यात तपासात हे प्रकरण उघड झाले होते, हत्याकांड गुन्ह्यात हजारे साक्षीदार आहेत. गुन्हा नोंद झाल्यापासुन या प्रकरणाला तब्बल 15 वर्ष झाली आहेत.
कै पवनराजे व त्यांचा ड्राईवर समद काझी हत्याकांडातील आरोपी पारसमल ताराचंद बादला ( जैन ) याने कोर्टात सीआरपीसी 164 च्या नुसार न्यायाधीश एस बी महाले यांच्यासमोर जबाब दिला. जबाबात माजी गृहमंत्री पदमसिंह पाटील यांनी अण्णा हजारे याची हत्या करण्याची 30 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे सांगत 17 पानाच्या जबाबात पवनराजे दुहेरी हत्याकांड कसे शिजले व घडले हे 25 सप्टेंबर 2009 रोजी सांगितले.या घटनेननंतर अवघ्या 4 दिवसांनी समाजसेवक किशन उर्फ अण्णा बाबुराव हजारे यांनी थेट लातूर गाठत स्वतः एमआयडीसी पोलीस ठाण्यात 29 सप्टेंबर 2009 रोजी माजी गृहमंत्री डॉ पदमसिंह बाजीराव पाटील , सतीश मंदाडे , मोहन अनंत शुक्ला यांच्यासह अन्य 4 जणा विरोधात हत्येचा कट व हत्येची सुपारी दिल्याचा गुन्हा नोंद केला.
सीआयडीने या प्रकरणात 2009 ते 2018 या 9 वर्षात कोणताच तपास न केल्याचे माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीत (आरटीआय) उघड झाले. पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र जयराजे निंबाळकर यांनी अण्णा हजारे हत्या कट व सुपारी प्रकरणातील तपासाची माहिती मागवली होती त्यात हा खुलासा झाला. गुन्हे अन्वेषण विभागाचे औरंगाबाद विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सी जी कांबळे यांनी माहिती अधिकारात लेखी उत्तर दिले आहे यात तपास चालू असल्याचे व आरोपपत्र दाखल न केल्याचे म्हण्टले होते. त्यानंतर 2019 च्या आसपास तब्बल 10 वर्षानंतर 3 आरोपी विरोधात दोषारोपपत्र दाखल केले तर 2022 पासुन अजुन चार्ज फ्रेम न झाल्याने साक्षी, पुरावे या सुनावणीला सुरुवात झालेली नाही.
न्यायमूर्ती पी बी सावंत आयोगात भ्रष्टाचारात दोषी सापडल्याने डॉ पद्मसिंह पाटील यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. 3 जून 2006 रोजी नवी मुंबई येथील कळंबोली येथे पवनराजे व त्यांचा ड्राइवर समद काझी या दुहेरी हत्याकांडात राज्याचे माजी गृहमंत्री तथा माजी खासदार डॉ पदमसिंह पाटील यांच्यासह मुंबई येथील नगरसेवक मोहन शुक्ला , उत्तर प्रदेश मधील बहुजन समाज पक्षाचा नेता कैलास यादव , माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी, लातूर येथील सतीश मंदाडे, पारसमल जैन,शुटर दिनेश तिवारी , पिंटू सिंग व छोटू पांडे हे संशयीत आरोपी आहेत. हे प्रकरण सुनावणीच्या अंतीम टप्प्यात असुन अंतीम युक्तीवाद मुंबईचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए ए जोगळेकर यांच्या कोर्टात सुरु आहे. 4 जुलै 2011 पासुन तब्बल साडे 13 वर्षांपासुन याची सुनावणी सुरु आहे. 27 जानेवारी 25 पर्यंत अंतीम युक्तिवाद होणार आहे.