धाराशिव – समय सारथी
आरोग्य सेवक पदावर नौकरी लावतो म्हणुन 8 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राघुचीवाडी येथील दत्तात्रय संपत करवर या सुशिक्षित बेरोजगार तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून अंकुर रावसाहेब देशमुख ( रा नरखेड, ता मोहोळ, जिल्हा सोलापूर) व मुंबई येथील संजय यमाजी साळवे यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आले आहे. दोघांच्या विरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 406,420,34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
राज्यभर ही टोळी सक्रीय असल्याची प्राथमिक माहिती असुन धाराशिव, सोलापूर, बीडसह अन्य जिल्ह्यात नौकरीचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे. देशमुख व साळवे या दोघांनी करवर याला विश्वासात घेऊन सांगितले की, तु 8 लाख रुपये दे, तुला आरोग्य सेवक म्हणुन नौकरी लावतो. आजवर आम्ही अनेक लोकांना नौकऱ्या लावल्या आहेत तुलाही त्याप्रमाणे नौकरी लावतो. त्या दोघांवर विश्वास ठेवुन सुरुवातीला अंकुर देशमुख याच्याकडे 2 लाख रुपये रोख दिले व त्यानंतर 3 लाख रुपये रोख दिले.
संजय साळवे याच्या कोटक बँक कल्याण वेस्ट, ठाणे, मुंबई या बँकेत खाते क्रमांक 9512645525 यावर दिनांक 12/10/2021 रोजी फिर्यादीच आई सिंधूबाई संपत करवर यांचे प्रभात मल्टीस्टेट बँक शाखा धाराशिव खाते क्रमांक 001806 वरून NEFT चेक क्रमांक 032133 ने 1,50,000 रुपये जमा केले. रोख रक्कम घेऊन देशमुख याने साळवेच्या फोन पे वर 7 ऑक्टोबर 21, 16 ऑक्टोबर, 21 ऑक्टोबर, 22 ऑक्टोबर, 26 ऑक्टोबर 21 व इतर तारखेला वेळोवेळी असे दीड लाख जमा केले. पैसे घेऊन अनेक वर्ष झाली तरी नौकरी लावली नाही, वेळोवेळी केवळ आश्वासन दिले.