धाराशिव – समय सारथी
तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देतानाचे वादग्रस्त संकल्पचित्र तुळजाभवानी मंदीर संस्थानने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून हटावले आहे. संकल्प चित्र व विकास आराखडा असलेले पॉवर पॉईंट सादरीकरण मंदीर संस्थानने काढुन टाकले आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी याबाबत तसे निर्देश दिले होते त्यानुसार मंदीर संस्थानने अंमलबजावणी केली आहे.
तुळजाभवानी माता भवानी तलवार देताना विकास आराखड्यातील संकल्पचित्रात अष्टभुजा दाखवण्यात आली होती त्यावर भाविक, पुजारी मंडळ यांनी आक्षेप घेतल्यावर ते काढुन तुळजाभवानी माता द्विभुजा (पारंपरिक भवानी तलवार) असलेली मुर्ती दाखवावी असे आदेश दिले होते त्यानुसार बदल करुन लवकरच नवीन संकल्पचित्र व आराखडा मंदीर संस्थानच्या वेबसाईटवर टाकण्यात येणार आहे अशी माहिती कळते.
तुळजाभवानी विकास आराखड्यांतर्गत श्री तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असल्याची 108 फुट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. भाविक व पुजारी मंडळांनी अष्टभुजा संकल्प चित्रावर आक्षेप नोंदवलेला आहे. त्यांच्या भावनांचा आदर राखत संकेतस्थळावरील विकास आराखड्याच्या संकल्प चित्रातून ही अष्टभुजा प्रतिमा काढून टाकण्यात यावे असे आदेश पालकमंत्री यांनी मुंबई येथील बैठकीत दिले होते. या बैठकीला छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागिय आयुक्त जितेंद्र पापळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषद मुख्याधिकारी डॉ मैनाक घोष, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शफाकत आमना व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
शिल्प तयार करताना पुरातत्व विभाग, इतिहास तज्ञ व अनुषंगिक घटकांशी चर्चा करून देवीची प्रतिमा कशी असावी याबाबत निर्णय घ्यावा असे निर्देश पालकमंत्री तथा तुळजापूर विकास प्रकल्पाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले. याबरोबरच यापुढे विकास आराखडा संदर्भात प्रसिद्धीसाठी द्यावयाची पत्रे, परिपत्रके ही परस्पर न देता अध्यक्षांच्या अनुमतीनेच देण्यात यावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थान अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांना दिले.
भाविकांना भविष्यात चांगल्या सुख- सुविधा मिळाव्यात तसेच तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने 1 हजार 865 कोटी रुपये खर्चाचा तुळजापूर विकास आराखडा बनवला. या प्रकल्पामध्ये तुळजाभवानी मंदिर व परिसर विकासाची कामे समाविष्ट आहेत.