धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील भुम परंडा मतदार संघाच्या जागेचा तिढा अखेर संपला असुन महाविकास आघाडीकडुन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राहुल मोटे यांना उमेदवारी दिली आहे, शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार रणजित ज्ञानेश्वर पाटील हे अर्ज मागे घेणार आहेत.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाने त्यांची 22 नावांची दुसरी यादी जाहीर केली होती त्यात राहुल मोटे यांच्या नावाची उमेदवार म्हणुन घोषणा करण्यात आली होती तर महाविकास आघाडीतील दुसरा पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने माजी आमदार कै ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. खुद्द उद्धव ठाकरे यांनी रणजीत यांना पक्षाचा एबी फॉर्म दिला मात्र जागावाटपात जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला गेली.
राहुल मोटे हे 2004, 2009, 2014 असे सलग 3 टर्म आमदार होते तर त्यांचे वडील महारुद्र बप्पा मोटे हे 1985 व 1990 असे 2 टर्म आमदार होते. इथे त्यांची 2024 मध्ये आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या विरोधात लढत होत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत परंडा मतदार संघात पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे विक्रमी 32 हजार 902 मतांनी विजयी झाले होते त्यांनी सलग 3 टर्म आमदार राहिलेल्या राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांचा पराभव केला होता. मोटे यांना 73 हजार 772 मते पडली होती तर सावंत यांना 1 लाख 6 हजार 674 मते पडली होती.