धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात चोरांची दहशत दिवसेंदिवस वाढत असुन तुळजापूर येथे मध्यरात्री 6 ते 7 जणांच्या टोळीने अक्षरशः धुमाकूळ घातला. तब्बल अर्ध्या तासाच्या पाठलाग व थरारनंतर नागरिकांनी 2 चोरांना 4 लाख 22 हजारांच्या मुद्देमालसह रंगेहात पकडले असुन 6 जणा विरुद्ध तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चोरट्यानी पाठलाग करताना एका चारचाकी व एका दुचाकीला उडवले, सुदैवाने यात कोणी जखमी झाला नाही. चोरट्याच्या या टोळीची तुळजापुरात दहशत असुन नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तुळजापूर शहराशेजारी असलेल्या काक्रबा शिवारात तुळजापूर येथील चंद्रकांत कणे यांचे स्टोन क्रशर आहे, या क्रशर व भागात चोरांच्या टोळीने रात्रभर धुमाकूळ घातला. हडको येथील स्वराज बाबासाहेब कांबळे, व मातंग नगर येथील राहुल विष्णु शिंदे या 2 जणांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले तर त्यांच्यासह साहिल सुनिल साठे, कुमार लोंढे, कुमार पौळ व दिनेश कसबे या 6 जणांवर भारतीय न्याय संहिता कलम 310(2) व 281 नुसार अक्षय चंद्रकांत कणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कणे यांच्या स्टोन क्रशरवर 6-7 लोकांनी चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला व त्यांना अडवले असतात त्यांनी अचानक हल्ला करुन दगडफेक सुरु केली. यात अण्णासाहेब राजकुमार कणे व मॅनेजर दयानंद जगदाळे हे जखमी झाले त्यानंतर चोरट्यानी दगड फोडण्याच्या प्लेट, लोखंडी चाळण्या, टिप्परचा फळका, ट्रॉली अक्सएल व इतर सामान चोरून एका छोटा हत्तीमध्ये भरले व तेथून पळ काढला. या गाडीचा पाठलाग करीत असताना त्यांनी एका चारचाकी व दुचाकीला जोराची धडक दिली. त्यानंतर कांबळे व शिंदे याला नागरिकांनी पकडले तर इतर 4 जण फरार झाले.