धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळ ग्रस्त भागातील नागरिकांना दिवाळी शिधा वाटप करण्यात येणार असुन पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे 2 नोव्हेंबरला धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. मदत नव्हे कर्तव्य अशी भुमिका असुन ते तामलवाडी, येणेगूर, जेवळी या ठिकाणी शिधा वाटप कार्यक्रम घेणार आहेत.
दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात येणार आहे. संकटाच्या काळात बळीराजाच्या पाठीशी उभं राहणं, हीच शिवसेनेची बांधिलकी असे म्हणत शिवसैनिक शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिली.
दिवाळी म्हणजे घराघरांत दिव्यांचा लखलखाट आणि आनंदाचा सण पण दुष्काळाच्या संकटाशी झुंजणाऱ्या बळीराजाची दिवाळीही गोड व्हावी, त्याच्या घरातही आनंदाचे दिवे उजळावेत, यासाठी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हेच आपलं पहिलं कर्तव्य आहे. हा केवळ शिधा नसून, संकटाच्या काळात बळीराजाच्या पाठीशी उभं असल्याचा विश्वास आहे; त्यांच्या कुटुंबाप्रती असलेल्या आपुलकीचा आणि माणुसकीच्या नात्याचा हा भावनिक धागा आहे. शेतकऱ्यांच्या घरातही दिवाळीचा गोडवा पोहोचावा, त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू फुलावं आणि त्यांच्या मुलांच्या डोळ्यांत आनंद चमकावा, हीच या उपक्रमा मागची भावना आहे असे सरनाईक म्हणाले.
आनंदाचा शिधा या किटमध्ये दिवाळीच्या फराळाचे साहित्य, कंदील, पणत्या, कालनिर्णय यांसह विविध वस्तू असतील. हे किट धाराशिव जिल्ह्यातील गरजू शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसेनेचे शाखाप्रमुख, नगरसेवक आणि जिल्हाप्रमुख कार्यरत राहणार आहेत. युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यासह टीमने याकडे लक्ष देत नियोजन केले आहे. धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत अश्या स्तिथीत हे कर्तव्य शिवसेना करीत आहे.











