धाराशिव – समय सारथी
तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात सोलापूर येथील एका गुन्हेगारी पार्शवभुमी असलेल्या मटका माफियाने दर्शन घेऊन फोटोसेशन केल्या प्रकरणी झालेल्या सर्वदुर टिकेनंतर तुळजाभवानी मंदीर संस्थानने कारवाईचे पाऊल उचलले आहे. मंदीर सहायक धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले यांना निलंबित करण्यात आले आहे. भोसले यांचे निलंबन केले असले तरी मटका किंग अरुण प्रभाकर रोडगे उर्फ दादा रोडगे व आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे स्वीय सहायक सुधीर जमदाडे यांच्यासह अन्य जणांना अभय देण्यात आल्याचा आरोप होत आहे.
भोसले यांचे निलंबन केले म्हणजे या विषयावर पडदा पडेल असे नाही, जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत पाठपुरावा करू अशी प्रतिक्रिया भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष कदम यांनी दिली. भोसलेंचे निलंबन म्हणजे ‘चोर सोडून सन्यास्याला फाशी’ असा प्रकार असुन त्यांना ‘बळीचा बकरा’ बनविले असल्याचा आरोप सोशल मीडियावर होत आहे. गुंड रोडगे व जमदाडे यांच्यासह ज्यांच्या सांगण्यावरून आत प्रवेश दिला गेला त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा अशी मागणी आता जोर धरत आहे. सर्व जण फोटोमध्ये दिसत आहेत मग चौकशी कसली, चौकशीच्या नावाखाली वेळकाढुपणा व वाचवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे.
सामान्य भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश बंदी असताना एका गुंडाला मात्र व्हीआयपी सेवा देण्यात आली यावेळी पीए जमदाडे दिमतीला होते. याचे फोटो सोशलचे मीडियावर व्हायरल झाले आहेत, आमदारांचे पुन्हा एकदा माफियाबाबत झुकते माप दिसुन आले. दरम्यान महंत वाकोजीबुवा यांना प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आली आहे.
हातच्या काकणाला आरसा कशाला ? याप्रमाणे उघड उघड ते सर्व गाभाऱ्यात दिसत असताना आता आमदार कोणती चौकशी करणार हा प्रश्न आहे. गेली काही काळापासून त्यांनी मनमानी कारभार व मंदीराला खासगी मालमत्ता समजली आहे, जे की चुकीचे आहे. तुम्ही मुंबईतील ताज मध्ये आहेत की दिल्लीत याचे भाविकांना देणे घेणे नाही, कारवाईचा बोला ? विषयांतर करू नका, पीएवर काय कारवाई करणार, कोणाच्या आदेशाने तो सोबत गाभाऱ्यात गेला, परिसरातील सीसीटीव्ही तपासा. पाठराखण करू नका. ‘हाताची घडी तोंडावर बोटं’ अश्या स्वरूपाची ही नाटकी दुटप्पी भुमिका असल्याचा आरोप पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी केला आहे.











