छोटे विषय मोठे करता – आमदार राणाजगजितसिंह पाटीलांचा विरोधकांना सल्ला
धाराशिव – समय सारथी
“माझ्याबद्दल किंवा माझ्या पीएच्या (PA) नावाने काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. अशा विषयांमध्ये माझे नाव थेट हायलाइट करण्याआधी माझ्याशी संपर्क साधून किमान विचारणा करून वस्तुस्थिती जाणून घेणं अत्यावश्यक होतं,” अशा शब्दात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी माध्यमांशी बोलताना आपली भावना व्यक्त केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात पिक विमा प्रकरणाशी निगडित असलेल्या एका महत्त्वाच्या सुनावणीसाठी आपण दिल्लीत होतो. दरम्यानच्या कालावधीत श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात घडलेल्या प्रकाराबाबत बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जे काही चुकीचे घडले असेल, त्यावर पारदर्शक चौकशी होईल आणि योग्य ती कारवाई नक्कीच केली जाईल असे स्पष्ट केले. सर्व व्हिडिओ फुटेज उपलब्ध असून त्यात लपवण्यासारखे काहीही नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दुष्काळ आणि पीक विम्यावर विशेष लक्ष:
सध्या जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती असून पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि हाताला काम देणे हे विषय सर्वाधिक महत्त्वाचे आहेत. २०२० च्या पीक विमा संदर्भात आत्तापर्यंत सर्वोच्च न्यायालयात १६ सुनावण्या पार पडल्या असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रत्येक सुनावणीला उपस्थित राहून आपले सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी मोठा निधी आणून अशक्यप्राय वाटणारी अनेक कामे पूर्ण केली जात आहेत. काही लोक छोट्या विषयांचे मोठे भांडवल करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत, परंतु अशा सकारात्मक प्रयत्नांना माध्यमांनीही योग्य सहकार्य करावे, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी केले.











