धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारगाव येथील पृथ्वीराज बार अँड लॉजवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने छापा टाकून 8 महिलांची सुटका केली. लॉज मालक व मॅनेजर यांना अटक करण्यात आली असुन पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपासाला सुरुवात केली आहे.
पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांना माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांना तातडीने कारवाईचे निर्देश दिले. यानंतर पोलिसांनी सापळा रचत कारवाईची तयारी केली. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक माधुरी मारकड, PSI सोनटक्के, महिला पोलीस अंमलदार पुरी, जाधव, दूधभाते, पोलीस नाईक माने, चालक तसेच डमी ग्राहक यांच्या मदतीने संपूर्ण कारवाई केली.
प्राथमिक तपासामध्ये लॉज मालक घुले व मॅनेजर शेट्टी हे एजंटच्या माध्यमातून महिलांना लॉजमध्ये आणून त्यांना पैशांचे आमिष दाखवत, त्यांच्या माध्यमातून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले.
या प्रकरणी PSI सोनटक्के यांनी वाशी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून Immoral Traffic (Prevention) Act (ITP Act) अंतर्गत व BNS चे विविध कलमान्वये संबंधित दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक धाराशिवचे जनतेला आवाहन
जिल्ह्यात कुठेही चोरीछुप्या पद्धतीने वेश्याव्यवसाय, मानवी तस्करी अथवा महिलांचे शोषण होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी ती तत्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे











