धाराशिव – समय सारथी
पोलिस दलात 15 वर्षांपेक्षा अधिक काळ प्रदीर्घ, प्रामाणिक व निष्कलंक सेवा बजावल्याबद्दल पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचा स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित कार्यक्रमात भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून पोलिस दलातील प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेसाठी ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचा विशेष गौरव करण्यात आला.
15 वर्षांहून अधिक काळ पोलिस सेवेत कर्तव्यनिष्ठेने काम करताना त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत मिळालेला हा सन्मान त्यांच्या प्रामाणिक व समर्पित सेवेला मिळालेली मोठी पावती मानली जात आहे. हा गौरव पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्यासाठी निश्चितच प्रेरणादायी असून, त्यांच्या पुढील सेवेला अधिक बळ देणारा ठरणार आहे. त्यांच्या कार्यातून पोलिस दलातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा मिळत आहे.
जिल्हाधिकारी परिसरातील प्रांगणात झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील, जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर आणि पोलीस अधीक्षक रितू खोखर यांची उपस्थिती होती.












