धाराशिव – समय सारथी
पालकमंत्री तथा परीवहन मंत्री प्रतापराव सरनाईक हे तामलवाडी टोलनाक्यावर अतिक्रमण मुक्तीची शासकीय बैठक घेणार असल्याने महसूल, आयआरबी व पोलिस प्रशासन कामाला लागले असुन धावपळ सुरु आहे. पालकमंत्री सरनाईक यांची टोल नाक्याजवळ महामार्ग लागत 20 एकर जमीन आहे, त्यात भव्य दिव्य रिसॉर्टचे नियोजन असुन काम सुरु आहे. या रिसॉर्टची ‘शोभा’ टोल नाक्याजवळ असलेल्या दुकाने व इतर अतिक्रमणामुळे कमी होणार असल्याने पालकमंत्री यांनी शासकीय यंत्रणेला कामाला लावल्याचा आरोप होत आहे.
काही शासकीय नियमांचा आधार घेऊन टोल नाका परिसरात व काही शेतकऱ्याच्या जमिनीत असलेली दुकाने, टपरी ही अतिक्रमणाच्या नावाखाली काढून टाकण्याचा घाट रचला आहे. तामलवाडी येथील अनेक लोकांचा रोजी रोटी, रोजगार व व्यवसाय या दुकानावर अवलंबून आहे मात्र त्यावर ‘बुलडोजर’ चालविण्याची तयारी सुरु केली आहे. एकदरीत पालकमंत्री यांची ही भुमिका आगामी काळात वादग्रस्त ठरणार असल्याचे दिसते.
धाराशिव शहरासह अन्य ठिकाणी सार्वजनिक जागेवर, रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले असुन दुकाने, टपऱ्या सुरु आहेत त्यामुळे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अशी वस्तुस्तिथी असताना पालकमंत्री सरनाईक यांनी मात्र स्वतःच्या जमिनीलगत असलेल्या तामलवाडी टोल नाक्याच्या जवळील अतिक्रमणाची अधिक ‘चिंता’ व ‘गांभीर्य’ वाटते, असेच म्हणावे लागेल.
पालकमंत्री हे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत असुन त्यांच्या शासकीय दौऱ्यानुसार ते 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता तामलवाडी टोलनाका येथील अतिक्रमण हटवीण्याबाबत व टोल नाक्यावरील स्वच्छतागृहाच्या सोयी सुविधाबाबत टोलनाका स्थळी बैठक घेणार आहेत. वैयक्तिक लाभ व अतिक्रमणाच्या नावाआड शेतकरी, व्यापारी यांच्यावर अन्याय होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
डॉ पद्मसिंह पाटील, मधुकरराव चव्हाण, प्रा डॉ तानाजीराव सावंत हे सोडता परजिल्ह्यातील पालकमंत्री हा धाराशिवचा तसा इतिहास.. अनेक पालकमंत्री धाराशिव जिल्ह्याला लाभले मात्र त्यातील एकही धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी झाला नाही किंवा त्यांना तसा ‘मोह’ झाला नाही. आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे तुळजापूरचे आमदार असतानाही त्यांनी तसे विशेष प्रयत्न केलेले दिसत नाही. धाराशिवचा पालकमंत्री म्हणुन शेतकरी होण्याचा पहिला ‘मान’ मात्र यानिमित्ताने सरनाईक यांना मिळाला आहे. त्यांच्या नावे 114,116,117,129,210 व 211 अश्या 6 गटात 8.22 हेक्टर म्हणजे जवळपास 20 एकर हाय वे टच जमीन असुन ‘जमीनदार’ बनले आहे.











