धाराशिव – समय सारथी
जलसंधारणाला चालना देत जलसाठ्यांची क्षमता वाढविणे, धरणे व तलावांतील गाळ काढून त्याचा शेतीसाठी सुपीक माती म्हणून उपयोग करणे आणि जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करून शेतीची उत्पादकता वाढविणे,हा ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेचा मुख्य उद्देश आहे. जलसंधारणासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीस हातभार लावणाऱ्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात सन 2024-25 व 2025-26 मध्ये मंजूर झालेल्या 155 कामांची त्रयस्थ अधिकाऱ्यांमार्फत पडताळणी पूर्ण झाली असून, त्यामध्ये कोणतीही अनियमितता आढळून आलेली नसल्याची माहिती मृद व जलसंधारण विभागाने दिली आहे.
28 जून 2026 च्या शासन निर्णयानुसार “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” तसेच “नालाबांधणीकरण व रुंदीकरण” योजनेंतर्गत 155 कामांसाठी निधी प्राप्त झाला आहे. त्यामध्ये जलसंपदा विभागाची 45 तर मृद व जलसंधारण विभागाची 110 कामे समाविष्ट आहेत.पूर्ण झालेली कामे 60 अशासकीय संस्था आणि 5 ग्रामपंचायतींच्या माध्यमातून राबविण्यात आली असून,त्यात धरणांतील गाळ काढणे तसेच नालाबांधणीकरण व रुंदीकरणाच्या कामांचा समावेश आहे.
या कामांची त्रयस्थ अधिकाऱ्यांमार्फत पडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिले होते.त्यानुसार सर्व 155 कामांची सखोल तपासणी करण्यात आली. या तपासणीत कोणत्याही कामात अनियमितता आढळून आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान,या कामांबाबत कोणत्याही शेतकऱ्याला काही तक्रार किंवा समस्या असल्यास त्यांनी मृद व जलसंधारण विभाग,धाराशिवचे जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्या कार्यालयात पुढील तीन दिवसांच्या आत लेखी स्वरूपात आपली तक्रार सादर करावी,असे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त तक्रारींचे निराकरण केल्यानंतरच संबंधित निधीचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी यांनी दिली.











