दै समय सारथीच्या पाठपुराव्याला यश – वसुलीसह गुन्हा नोंद होणार का ? वेतन, शेडनेट, सेवा वर्गसह घोटाळे
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात एकात्मिक कीड व्यवस्थापन व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन योजनेत अधिकाऱ्यांनी केलेल्या महाघोटाळ्यात 17 अधिकाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले होते त्यातील 15 कृषी अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. चौकशी अहवालानंतर व टिकेनंतर कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी ही कारवाई केली. भुमीहीन, मयत, दुबार, बिगर सभासद यांच्या नावाने निविष्ठा वाटप झाले होते. घोटाळ्यातील 2 कोटी 32 लाख रुपयांच्या रक्कम वसुलीसह या 15 जणांवर फौजदारी गुन्हे नोंद होणे गरजेचे आहे.
आमदार कैलास पाटील यांनी यांची तक्रार केली होती तर शेतकरी आंदोलक अमोल जाधव यांनी धाराशिव व पुणे आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केले होते. दैनिक समय सारथी वृत्तपत्राने निविष्टासह वेतन, शेडनेट, सेवा वर्गसह अन्य घोटाळे व आयुक्त रफिक नाईकवाडींसह सन्मानाची सेवा निवृत्ती आणि घोटाळा करा पैसे भरा व मुक्त व्हा असा पॅटर्न सुरु असल्यासह अन्य बाबी मांडत कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थितीत केले होते. शेतकऱ्यांच्या योजनावर डाका टाकणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंद होईपर्यंत पाठपुरावा सुरु असणार आहे, गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे.
धाराशिव कृषी निविष्टा घोटाळ्यात 2 जिल्हा कृषी अधीक्षक, 8 तालुका कृषी अधिकारी, 4 मंडळ कृषी अधिकारी यांचा यात समावेश आहे. धाराशिव तालुक्यात सर्वाधिक 44 लाख 25 हजार, तुळजापूर 44 लाख, कळंब व परंडा तालुका 33 लाख 40 हजार, वाशी 21 लाख 45 हजार, भुम 22 लाख 45 हजार, लोहारा तालुका 22 लाख 37 हजार उमरगा तालुक्यात एका योजनेत 10 लाख 65 हजार अशी घोटाळा रक्कम आहे. शेतकरी प्रशिक्षणातही घोळ घातला असुन रक्कम हडप केली आहे.
प्रभारी कृषी उपसंचालक पुरुषोत्तम वाघमारे, जिल्हा कृषी अधीक्षक राजकुमार मोरे यांच्यासह तत्कालीन प्रभारी कृषी अधीक्षक तथा उपविभागीय कृषी अधिकारी महादेव असलकर यांच्यासह जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील जिल्हा सल्लागार सतीश सुरवसे, तंत्र अधिकारी राहुल दिवाणे, सहायक कृषी अधिकारी राहुल सूर्यवंशी यांना जबाबदार धरण्यात आले आहे.
वाशी तालुका कृषी अधिकारी राजाराम बर्वे, भुम तालुका कृषी अधिकारी अतुल ढवळे, परंडा तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांगडे, कळंब तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे, धाराशिव व लोहारा तालुका कृषी अधिकारी महेश देवकते, उमरगा तालुका कृषी अधिकारी ज्ञानोबा रितापुरे, तुळजापूर तालुका कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख या 8 तालुक्याच्या 7 कृषी अधिकारीसह मंडळ कृषी अधिकारी अणदूर काटकर, काटीचे नागटिळक, नळदुर्गचे एस जी देशमुख व तुळजापूर मंडळ कृषी अधिकारी भोसले या 4 मंडळ कृषी अधिकारी यांचा समावेश आहे.
धाराशिव जिल्ह्यात 2025-26 च्या हंगामात कृषी विभागाकडुन वितरित होणाऱ्या कृषी निविष्ठा व फवारणी कीटमध्ये अधिकाऱ्यांनी घोटाळा केल्याचे चौकशी अंती उघड झाले आहे. भुमीहीन, मयत, दुबार, बिगर सभासद यांना लाभ दिल्याचे चौकशीत उघड झाले आहे. लातुर जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी 76 पानाचा अहवाल कृषी आयुक्ताना सादर केला आहे.











