धाराशिव – समय सारथी
निष्ठावान म्हणता तर मागील 30 वर्षांमध्ये भाजपच्या पक्ष संघटन बांधणीसाठी किंवा पक्ष वाढीसाठी आपले काय योगदान आहे हे उदाहरणासह संदर्भ स्पष्टीकरण द्यावे असे आव्हान जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना ताई पाटील यांनी भाजपच्या जुन्या नेत्यांना केले होते. त्याला भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य ऍड व्यंकट गुंड व विनोद गपाट यांनी प्रतीउत्तर दिले आहे. पाटील परिवार भाजपात नसतानाही जिल्ह्यात महायुतीचे खासदार, आमदार, जिल्हा परिषद व नगर सेवक होते असे गपाट म्हणाले तर पाटील पाटोदेकरसह गोरे यांचा भाजपच्या जुन्या सदस्यांनी पराभव केला असे गुंड म्हणाले.
शिवसेना भाजपा ही धाराशिव जिल्ह्यात पहिल्यापासून एक आहे. मागील 9 लोकसभा निवडणुकीपैकी 7 निवडणुका युतीने जिंकल्या. ज्यावेळी डॉ पाटील आणि मधुकरराव चव्हाण मंत्री होते त्यावेळी जिल्ह्यात 4 नगर परिषद, पंचायत समिती युतीने जिंकली होती, जिल्ह्यात युतीचे कायम 2-3 आमदार निवडून येतात. विजयाचे श्रेय कोणा एकाचे नाही तर युतीचे कार्यकर्ते आणि पक्षाचे आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे असे विनोद गपाट म्हणाले. पंचायत समिती, नगर परिषद भाजप सेना युतीच्या ताब्यात होती, आणखी संदर्भ हवे असतील तर योग्य वेळी देऊ असे गपाट म्हणाले.
पराभवाची भिती व सत्तेची लालसा यातून पाटील परिवाराने भाजपात प्रवेश केला त्यामुळे त्यांनी जुन्या पदाधिकारी यांच्यावर टीका करण्यापेक्षा आत्मचिंतन करावे असा सल्ला ऍड गुंड यांनी दिला. राष्ट्रवादी व पाटील परिवाराची एकहाती सत्ता असताना त्यांचे नातेवाईक जीवनराव गोरे यांचा सुधाकर गुंड गुरुजी यांनी 1997 साली पराभव केला तर भाचे अमोल पाटोदेकर यांचा रामदास कोळगे यांनी 2012 साली पराभव केला. पाटील परिवार व राष्ट्रवादी सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर असताना गुंड व कोळगे सारख्या सामान्य कार्यकर्ते यांनी पराभव केला त्यामुळे अतिआत्मविश्वास दाखवू नये असे गुंड म्हणाले.
लोकसभेला डॉ पाटील, त्यानंतर राणाजगजीतसिंह पाटील व नंतर अर्चना पाटील यांचा लाखोंच्या मतांनी पराभव झाला. डॉ पाटील व राणाजगजीतसिंह यांनी राष्ट्रवादीकडुन निवडणुक लढविली त्यावेळी त्यांचा भाजप सेना युतीने पराभव केला. पती भाजपात असताना खासदारकी व सत्तेच्या लालसेपोटी अर्चना पाटील ह्यांनी राष्ट्रवादीतुन निवडणुक लढविली त्यातही त्यांचा पराभव झाला यावरून जनता त्यांना स्वीकारत नसल्याचे दिसते, भाजपमुळे हे निवडून आले व राजकारणात टिकून आहेत. जसे यशाचे श्रेय घेता तसे या पराभवाचे पण घ्या. वारंवार होणारे अपयश व पराभवाची भिती असल्याने राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ते भाजपात आले हे सत्य सर्वासमोर मान्य करावे असे ऍड गुंड म्हणाले.
तेरणा कारखाना शेतकऱ्यांचा असताना तो बुडावला, तेरणा ट्रस्ट स्वतःच्या कुटुंबाच्या मालकीची केली, मेडिकल कॉलेज नेरुळला नेले, तिथे एक तरी मुलगा मोफत शिकवला का ? कारखाना उभा करायचा म्हणुन पैसे गोळा केले व फक्त चिमणी उभारली त्यांच्या मागून आम्ही 4-5 कारखाने उभे करून तरुणांना रोजगार दिले. यांनी उलट संस्था बुडीत काढून बंद पाडल्या व पैसे लुटले, नुसत्या पोकळ घोषणा केल्या, किती लोकांना रोजगार दिला. जुने भाजप कार्यकर्ते स्वाभिमानी आहेत, त्यांचे लाभार्थी नाहीत त्यामुळे त्यांना भीडभाड नाही. एक टेंडर त्यातून टक्केवारी हे धंदे आमचे नाहीत, आम्ही पक्ष शिस्त पाळली होती मात्र यांना संदर्भ हवे होते. आम्ही आमची बाजु पक्ष नेतृत्वाकडे मांडू असे ऍड गुंड म्हणाले.










