धाराशिव – समय सारथी
आई हीच आयुष्यातील पहिली गुरु असते, गुरुपौर्णिमेच्या पावन आणि मंगलमय शुभमुहूर्तावर श्री सिध्दीविनायक ऍग्रीटेक इंडस्ट्रीज लिमिटेड, देवकुरुळी (युनिट क्र.1) तसेच श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज लिमिटेड, खामसवाडी (युनिट क्र. 2) या दोन्ही कारखान्यांच्या हंगाम 2026-27 च्या मिल रोलर पूजनाचा विधीवत समारंभ करण्यात आला. सिद्धिविनायक समुहाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी यांनी त्यांच्या आईच्या शुभहस्ते अत्यंत भक्तिमय वातावरणात पुजन केले.
या उद्योगात मिल रोलर पूजन म्हणजे नवीन गळीत हंगामाच्या प्रारंभापूर्वी उत्पादन प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाच्या यंत्रणेचे पूजन करून सुरक्षित, सुरळीत आणि यशस्वी हंगामासाठी ईश्वराचे आशीर्वाद घेण्याची पवित्र परंपरा होय. शेतकऱ्यांचे हित, उद्योगाची प्रगती, कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि भरघोस गळीत हंगामाची प्रार्थना यामागील भाव असतो असे कुलकर्णी म्हणाले.
या प्रसंगी बालाजी कोरे, दिनेश कुलकर्णी, प्रतिक देवळे, गणेश कामटे, राजकुमार जाधव, मंगेश कुलकर्णी तसेच कारखान्यातील सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, ऊस वाहतूकदार आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.












