काळे अपमान प्रकरण – पक्षश्रेष्टीकडे मांडणार व्यथा व वस्तुस्तिथी, जिल्हाभरातुन प्रतिक्रिया, मोर्चेबांधणी
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्याचे भाजप संपर्कमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर भाजपचे नेते ऍड अनिल काळे यांना आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी अपमानास्पद वागणूक देऊन मंत्र्यांना भेटण्यापासुन अडविले. काळे यांच्या बाबतीत घडलेल्या प्रकारानंतर भाजपची जुनी टीम एकवटली असुन मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व मंत्र्यांना शिष्टमंडळ घेऊन भेटणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. घडलेला प्रकार व त्यावर आलेल्या प्रतिक्रिया ते वरिष्ठच्या दरबारात मांडणार आहेत.
काळे यांच्या प्रकारानंतर जुन्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची घुसमट बाहेर आली आहे. सोशल मीडियासह पक्ष श्रेष्टी यांना एसएमएस करून अनेकांनी भावनांना वाट मोकळीक करून दिली. आमदार पाटीलांचा हा प्रकार हुकूमशाही कारभार असल्याची टीका करीत त्यांच्या विरोधात भाजपची जुनी टीम एकवटली आहे. या शिष्टमंडळात भाजपचे जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी असणार असुन त्यासाठी मोर्चेबांधणी सुरु आहे.
आमदार पाटील यांच्या पक्षांतर्गत कार्यपद्धतीवर टीका होताना दिसत आहे. वेळ व गरजेनुसार शीर्ष नेतृत्वासह पदाधिकारी याचे फोटो टाकणे, कधी कधी पक्षचिन्ह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष यांचा सुद्धा फोटो नसतो. सत्तेसाठी भाजप पक्ष हवा मात्र पक्ष शिस्त, पक्षातील नेतृत्व आणि जुने पदाधिकारी नको असेच धोरण असल्याचा आरोप ऍड अनिल काळे यांनी केला. हे हुकूमशाही वागणे खपवून घेतले जाणार नाही, आम्ही गुलाम नाहीत असे ते म्हणाले.
अवैध प्रकारांना पाठीशी घालणे, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे उदात्तीकरण राजाश्रय, नुकतेच आमदार पाटील यांचे पुत्र मेघ पाटील यांनी “स्त्रिया आणि लहान मुलांना मारहाण करून तुमच्या नाजूक अहंकाराला बळ मिळतं का ?” अशी पोस्ट केली होती, ती एक प्रकारे पक्ष विरोधी भुमिका आहे, यासह अन्य मुद्दे वरिष्ठना सांगणार असुन आम्हाला न्याय व सन्मानाची वागणूक मिळेल अशी प्रतिक्रिया काळे यांनी दिली.
कार्यकर्ते हे किरकोळ, फालतू आहेत, त्यांचे योगदान काय ? असा त्यांचा शुद्ध गोड गैरसमज त्यांचा आहे, कार्यकर्तेना किंमत न देणे, पदोपदी तुच्छ वागणुक देऊन चारचौघात अपमान करणे यात आमदार पाटील यांना कदाचित आसुरी आनंद मिळत असावा. मात्र आता हे सहन केले जाणार नाही. राणा पाटील हे पक्षाचे चालक मालक नसुन त्यांच्या या वागण्याने निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होत आहेत.











