धाराशिव – समय सारथी
‘आपला जीव धाराशिव व्हिजन 2030’ हा पथदर्शी उपक्रम असुन त्यातील अनेक योजना ह्या देश व राज्य पातळीवर रबविल्या गेल्या पाहिजेत असे म्हणत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी मांडलेल्या संकल्पना व योजनेचे कौतुक केले. जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या नेतृत्वाखाली या कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ग्रामविकास मंत्री गोरे बोलत होते.
‘आपला जीव धाराशिव व्हिजन 2030’ या मोहिमेची सुरुवात करण्यात आली, आपला जीव धाराशिव या गाण्याचे लोकार्पण करण्यात आले. अर्चना पाटील ह्या तळमळीने व जिल्ह्याचा विकास करण्यासाठी काम करतात, एकीकडे मुख्यमंत्री राज्याचे तर दुसरीकडे विकसित धाराशिवचे स्वप्न घेऊन अर्चना पाटील काम करीत आहेत असे म्हणत कौतुक केले. अश्या पद्धतीचे व्हिजन राज्यात प्रथमच घेतले असुन त्याचा अभिमान असुन संकल्पच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याला तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद होता, त्या जिल्ह्यात या व्हिजनची सुरुवात होत असुन ते 2030 पर्यंत नक्की पुर्ण होईल, असे गोरे म्हणाले. कृष्णा नदीचे पुराचे पाणी मराठवाड्याला देण्याचा निर्णय मुख्यमंत्री यांनी घेतला आहे त्यामुळे पाणी प्रश्न मार्गी लागेल असे ते म्हणाले.
आपले सर्वांचे निम्मे आयुष्य मोबाईल पाहण्यात जाते, घरात 5 सदस्य असले तर सगळ्याकडे मोबाईल असतो व ते एकमेकांशी बोलण्याऐवजी मोबाईलमध्ये दंग असतात. मुलांना मोबाईलमधुन बाहेर काढण्याचे कौतुकास्पद काम असुन या संकल्पचे राज्यात अनुकरण झाले पाहिजे. यासाठी आपण सुद्धा प्रयत्न करू असे ते म्हणाले. अर्चना पाटील यांनी ग्राम समृद्ध अभियान समजुन व अभ्यास करून अंमलबजावणी सुरु केली आहे. विद्युत शववाहिनी, वृक्षारोपण हे उपक्रम चांगले असुन त्याचे अनुकरण केले पाहिजे. राज्यातील 8 हजार गावाला आजही स्मशानभुमी नाही, जोपर्यंत स्मशानभुमी होत नाही तोपर्यंत इतर कामे होणार नाहीत असे ते म्हणाले.
आशा सेविकांना स्कुटी देणार असुन त्यांनी सरकारकडे पैसा मागितला नाही ही योजना सीएसआर मधुन राबवली जाणार असल्याचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी सांगितले हे कौतुकास्पद आहे असे गोरे म्हणाले. आशा सेविकेमुळे अनेक रुग्णाचे प्राण वाचले त्यामुळे त्याचे कार्य मोठे आहे. मानधनात वाढ करून त्यांचा एकप्रकारे सन्मान केला. सरपंच यांना मानधन मुख्यमंत्री यांनी सुरु केले. कोतवाल यांना सन्मानाची वागणूक व मानधन दिले. धाराशिव व्हिजन 2030 मधील वाचनालय व अभ्यासिका, ई लर्निंग यासह अनेक बाबींचा आदर्श राज्य पातळीवर घेता येईल असे उपक्रम असल्याचे ते म्हणाले.
वाचनालयामुळे नवीन पिढी घडेल, हा चांगला निर्णय असुन देशभरात याची अंमलबजावणी झाली पाहीजे. गावात जीम असेल तर चांगले आरोग्य राहते. ग्रामविकास व उमेदच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून महिला सक्षमीकरण केले जाईल. महिला आरक्षण म्हणतात मात्र काहींनी त्याला संसदेत विरोध केला मात्र पुन्हा ते बील आणुन महिलांना न्याय देऊ असे गोरे म्हणाले. राज्यात पहिला नंबर धाराशिव जिल्हा परिषदेचा आला पाहिजे असे आवाहन केले.
व्यासपीठावर आमदार राणाजगजीतसिंह पाटील, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियांवदा महाडदळकर, पोलिस अधीक्षक रितू खोखर, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नगराध्यक्ष नेहा काकडे, नितीन काळे, ऍड नितीन भोसले यासह जिल्हा परिषद सभापती, सदस्य उपस्थितीत होते. जिल्हा ग्रामविकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) तुकाराम भालके, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.












