तुळजाभवानी देवीच्या 4 मठाना सेवेसाठी जमिनी – घोटाळ्याचा आरोप, मंदीर महासंघ व आमदार आक्रमक
धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मठाना सेवेसाठी देण्यात आलेल्या इनामी जमिनीची चौकशी करण्यासाठी 4 वरिष्ठ आयएएस अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली असुन ही समिती अभिलेखे पडताळणी व सद्य स्तिथीचा आढावा घेणार आहेत. विभागीय आयुक्त, पुणे हे या समितीचे अध्यक्ष तर जिल्हाधिकारी, अहिल्यानगर, जिल्हाधिकारी, सोलापूर व सह आयुक्त (महसूल), विभागीय आयुक्त कार्यालय पुणे हे सदस्य सचिव असतील. ही समिती 1 महिन्यात अहवाल शासनास सादर करणार आहे.
मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी निवेदन देऊन अनेक गंभीर आरोप केले आहेत. विधिमंडळ अधिवेशनात 293 च्या अन्वये सभागृहातील चर्चेवेळी विधानसभा सदस्य यांनी “तुळजाभवानी जमीन घोटाळ्याबाबत” मुद्दा उपस्थित केला होता. सदर मुद्याच्या अनुषंगाने या चर्चेस उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी विभागीय आयुक्त, पुणे यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल,असे आश्वासन दिले होते त्यानुसार ही समिती गठीत केली आहे. सर्व अभिलेख्यांची तपासणी करुन, मुद्देनिहाय चौकशी अहवाल 1 महिन्यात शासनास सादर करावा असे आदेशीत केले आहे.
महंत भारतीबुवा मठ, महंत प्रकाशनाथबुवा मठ, वाकोजीबुवा मठ व हमरोजीबुवा मठ अश्या 4 मठाना 1886 ते 1889 या काळात झाडलोट, सदावर्त,खैरात मंदीर उघडणे व बंद करणे, पुजा व नंदादीप, श्रीदेवीजीस अलंकार घालणे, वस्त्र नेसविणे, आरती धुपारती व गंध पुरविणे यासह अन्य सेवेसाठी जमिनी दिल्या होत्या. मंदिरामध्ये 1909 साली भोपी व पाळीकर यांच्यामध्ये वाद झाल्याने तत्कालीन निजाम सरकारने कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याकरीता खास फर्माण काढून देवस्थान मंदिर हे शासनाच्या नियंत्रणाखाली घेतले होते.
तुळजाभवानी देवीच्या मठाना 4 हजार 120 एकर जमीन निजामाकडून विविध सेवा करण्यासाठी देण्यात आली होती. सदर जमिनीची खरेदी विक्री होऊ शकत नाही असे असतानासुध्दा महसूल अधिका-यांच्या संगनमताने खाजगी व्यक्तींना वाटप करण्यात आली आहे काय देवस्थानच्या नावे जमीन असताना प्रत्यक्ष जमिनीचा ताबा मात्र काही खाजगी व्यक्तींच्या नावे वाटप करण्यात आली आहे काय ? अव्वल कारकून यांनी अधिकाराचा गैरवापर करुन 261 एकर जमीन खाजगी व्यक्तींच्या नावे केली. अपसिंगा व उपळा येथील 158 एकर जमीन अनधिकृतपणे फेरफार नोंदी करण्यात आल्या आहे काय ? याची चौकशी केली जाणार आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले होते त्यानंतर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी चौकशी समिती गठीत केली होती. अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीत सदस्य सचिव म्हणुन धाराशिवचे उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे सदस्य आहेत. या दोन्ही समिती चौकशी करणार आहेत.











