धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात SIR मोहिमेचा बोजवारा उडाला असुन एकाच ठिकाणी संपर्क कार्यालयात नोंदणी होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. धाराशिव शहरातील काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक उजमा सबा अझहर पठाण यांच्या कार्यालतील हा व्हिडिओ असुन यात बीएलओ नोंदणी करताना दिसत आहे. निजाम नदाफ यांनी हा व्हिडिओ फेसबुकवरून व्हायरल केला आहे, यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये बीएलओ नोंदणी करीत आहे, मुळात त्यांनी प्रत्येक घरी जाऊन नोंदणी करणे अपेक्षित आहे मात्र तसे होताना दिसत नाही. या व्हिडिओ नंतर जिल्हाधिकारी काय कारवाई करणार हे पाहावे लागेल. चुकीचे मॅपिंग व नंतर काही चुकीची मतदार नोंदणीचे प्रकार यातून घडू शकतात त्यामुळे अश्या प्रकाराला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे.
नागरिकांच्या व बीएलओ यांच्या सोईसाठी हे केंद्र सुरु केले आहे. काही जण सकाळी कामाला जातात घरी महिला असतात त्यामुळे मदतीच्या भूमिकेतून हे केले असल्याचे अझहर पठाण यांनी सांगत असा प्रकार घडला असल्याची पुष्टी दिली.
मतदान केंद्रातील प्रत्येक घराला भेट देणे, प्रत्येक मतदाराची ओळख व वास्तव्यासंबंधी पडताळणी करणे. पात्र मतदारांची माहिती पडताळणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे. मृत, स्थलांतरित किंवा अपात्र मतदारांची माहिती गोळा करणे. मतदारांकडून आवश्यक अर्ज व कागदपत्रे स्वीकारणे. मतदार यादीतील त्रुटी दुरुस्तीसाठी अर्ज घेणे. सर्व माहिती वेळेत निवडणूक नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणे अशी जबाबदारी बीएलओची आहे.












