धाराशिव – समय सारथी
एका महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्यावर लैंगिक अत्याचार व आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार धाराशिव येथे घडला आहे. एका माजी आमदाराच्या नातवाने उच्च शिक्षित महिलेला गोड बोलुन प्रेमाच्या जाळ्यात ओढले, त्यानंतर तिच्यासोबत लग्न केल्याचे ‘नाटक’ करून विविध कारणे सांगून तिची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
सध्या हा नातु आजोबांनी काही सवंगड्या सोबत सुरु केलेल्या धाराशिव जिल्ह्यातील एका नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेचा वारसा हक्काने ‘चालक- मालक’ बनला आहे. प्रेमाच्या ‘गावकरी’ बोलण्याला ती महिला चांगलीच भुलली आणि लाखो रुपयाला फसली.
सुरुवातीला सोशल मीडियाच्या माध्यमातून या नातवाने या महिलेशी जवळीक करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आजोबांचे नाव मराठवाड्यात प्रसिद्ध असल्याने महिलेला आदर होता त्यातच ती भुलली, आजोबांना घेऊन तो कारण काढुन तीच्याकडे जायचा. हळुहळु संपर्क वाढला, प्रेमाच्या गप्पा मारत शपथा घेतल्या.
आमची आर्थिक स्तिथी चांगली आहे पण माझ्या हातात व्यवहार नाही, मला व्यवसायाला आर्थिक गरज आहे, माझ्याकडे पैसे आले की परत देतो असे सांगून पैसे मागुन घेतले. कधी थार गाडी घेण्यासाठी तर कधी ऐश्वर्य कमी असल्याचे सांगत कृषी दुकानाचे कंपनीला बील देण्यासाठी अशी कारणे सांगून लाखो रुपये घेतले. विश्वास बसावा म्हणुन महिलेला एक मंगळसुत्र भेट देऊन लग्न केल्याचे सांगितले. मी अविवाहित आहे, तुझ्याशीच लग्न करेल नाहीत तर नाही असे म्हणुन विश्वास संपादन केला.
शैक्षणिक संस्थेतील रंजक बाबी सांगत संस्था ताब्यात आली की स्तिथी सुधारेल मग आपण जाहीरपणे लग्न करू असे सांगितले. अध्यक्ष बनुन संस्था ताब्यात आल्यावर चित्र बदलले आणि तिला सपशेल दुर केले. माझे वडील, मामा खुप डेंजर असुन तुझ्यासह मुलीला कुठे गायब करतील हे कळणार सुद्धा नाही, त्यांनी अनेक कांड पचवले आहेत अशी धमकी दिली. तू जास्त मागे लागली किंवा कोणाला सांगितले तर मी आत्महत्या करेल असे म्हणत त्याने महिलेला भावनिक केले.
लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक, मुलीच्या जीवाची काळजी व सामाजिक प्रतिष्ठा यात हे सगळे प्रकरण अडकले आहे. आर्थिक सक्षम, उच्च प्रतिष्ठित घरातील महिलांना हेरून जाळ्यात ओढून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे.











