धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी धाराशिवसह छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, नागपूरसह राज्यभरातील 150 हून जास्त ठिकाणांवर छापे टाकले. पाकिस्तानात बसून भारतीय तरुणांना देशविरोधी कारवायांसाठी चिथावणी देणारा आयएसआयचा हस्तक शहजाद भट्टीच्या राज्यातील नेटवर्कविरोधात कारवाई करीत धाडी टाकल्या.
या मोहिमेत एटीएसने सोशल मीडियावरून भट्टीच्या संपर्कात असलेल्या 175 संशयितांना शोधून काढले असून त्यांची कसून चौकशी करीत आहे. एटीएसच्या 14 प्रादेशिक विभागातील 58 पथकांनी राज्यभरात शुक्रवारी सकाळी 7 वाजेपासून एकाच वेळी ही मोहीम राबवली.
बंदी घातलेल्या मेसेजिंग ऍप्सच्या माध्यमातून भट्टीच्या संपर्कात आलेल्या या तरुणांचा शोध एटीएसने घेतला आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांचे सध्याचे लोकेशन, त्यांची पार्श्वभूमी आणि त्यांच्या हालचाली तपासल्या, चौकशीनंतर काहींना सोडून दिले. तरुण पिढीचे ब्रेनवॉश करून त्यांना देशविघातक कृत्यांकडे वळवण्याचा भट्टी काम करायचा.
मराठवाड्यातील अनेकांची चौकशी
एटीएसने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून 10 संशयितांना (वैजापूर 2, मिसारवाडी 3, हसूल 1, आरिफ कॉलनी 1, बायजीपुरा 1 व गंगापूर येथील 1 परप्रांतीय मजूर व अन्य भागातील 1 जण) ताब्यात घेतले होते. तर जालन्यातील 2, धाराशिवमधील 2, बीडमधील एकाला ताब्यात घेतले. धुळे 3,जळगाव 6, अहिल्यानगर 7, मालेगाव व नाशिकमधून प्रत्येकी 4, नागपूर 4, चंद्रपूर 3, गोंदिया, गडचिरोली, वर्ध्यात प्रत्येकी 1 संशयित ताब्यात घेतला.
दिल्ली पोलिसांनी पंजाब व दिल्लीतून भट्टीच्या 6 दहशतवादी हस्तकांना अटक केली. त्यांनी दिल्लीत अनेक ठिकाणी पेट्रोल बॉम्ब हल्ल्याचा कट रचल्याचे कबूल केले. यासाठी दानिश ऊर्फ चांद मिया याला 20 हजारांचे आमिष दिले होते.











