धाराशिव – समय सारथी
27 जुन रोजी मल्हार पाटील यांचा वाढदिवस संपन्न झाला, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर 2029 चे भावी खासदार असा उल्लेख केला गेला. भाजप नगरसेवक तथा भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल काकडे यांनी याबाबत बॅनर लावले, त्यात सत्य, स्पष्ट नेतृत्व असे म्हणत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. हे बॅनर चर्चेचा विषय ठरतं असुन टीम मल्हार ने आतापासून लोकसभेची तयारी व इच्छा व्यक्त केली.
किंगमेकर, लोकनायक असे म्हणत वाढदिवसाचे औचित्य साधत लोकसभा 2029 ची तयारी सुरु केली आहे. कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याकडुन ‘एकच पर्व मल्हार पर्व’ अशी घोषणा व नारा दिला आहे. मल्हार पाटील यांचे मागील काही वर्षात राजकीय महत्व वाढले असुन जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद ह्या निवडणुकीत त्यांनी राजकीय चुणूक व संघटन दाखवून दिले. त्यांनी नियोजन व कामातून अनेक गोष्टी सिद्ध केल्या. सहयोगी पक्षातील दुरावा समन्व्यतुन कमी करणे, नियोजन कौशल्य यासह अन्य बाबी जमेच्या ठरल्याने त्यांना मानणारा वेगळा गट आहे.
डॉ पद्मसिंह पाटील यांच्या रूपाने 2009 मध्ये पाटील परिवाराची देशाच्या राजकारणात खासदार म्हणुन एन्ट्री झाली त्यानंतर 2014 साली डॉ पाटील, 2018 साली राणाजगजीतसिंह पाटील व त्यानंतर 2024 साली अर्चनाताई पाटील यांनी नशीब आजमावले मात्र त्यांचा पराभव झाला. नुकतेच शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात आलेले खासदार ओमराजे निंबाळकर हे धाराशिव लोकसभेचे खासदार आहेत. विधान परिषदेला मल्हार पाटील यांचे समर्थक उत्सुक होते मात्र बसवराज पाटील यांना संधी मिळाली. 2029 च्या लोकसभेला आता मल्हार पाटील उत्सुक असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. तसे झाल्यास ओमराजे व मल्हार हे आमने सामने असतील.












