मृत्युदंड द्या, दुर्मिळ घटना – 25 लाखांची सुपारी, धाराशिव पोलिस सतर्क, निकालाकडे राज्याचे लक्ष
धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल 16 जुनला लागणार आहे. 2006 साली झालेल्या या हत्याकांडाचा तब्बल 20 वर्षानंतर निकाल लागणार असुन याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव पोलिस सतर्क असुन स्तिथीवर लक्ष ठेवुन असल्याची माहिती पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी दिली. निकालासाठी पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नी आनंदीदेवी, मुलगा खासदार ओमराजे, डॉ जयप्रकाश राजे तर काझी यांच्या पत्नी व मुलगा हजर राहणार आहेत.
मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस आर नावंदर यांच्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. डॉ पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपीना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राजकीय कारकीर्द व अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे व मोहन शुक्ला यांनी कट रचत 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचा ठपका सीबीआयने दोषारोप पत्रात ठेवला आहे. डॉ पाटील परिवारातील सदस्य सुद्धा या निकालाच्या वेळी कोर्टात हजर राहू शकतात अशी माहिती आहे.
हत्याकांडानंतर निंबाळकर परिवाराला रस्त्यावर उतरून व कायदेशीर संघर्ष करावा लागला. डॉ जयराजे निंबाळकर यांनी सर्व काही सोडून गेली 17 वर्ष पोलिस, कोर्ट कचेरीत घालवली तर शिक्षण अर्धवट सोडून ओमराजे निंबाळकर हे राजकारणात गेले, त्यानंतर त्यांचा राजकीय उदय झाला. हत्याकांड नंतर समद काझी परिवारातील 2 मुले व 1 मुलगी पोरके झाली, कालातराने शिक्षणासाठी ते लातुर येथे स्थायिक झाले. काझी यांची दोन्ही मुले बीएससी झाली असु एक मुलगी बीटेक झाली आहे. वडिलांच्या आठवणीने आजही निंबाळकर व काझी परिवाराचा कंठ दाठुन येतो.
पवनराजे यांची गाडी पारसमल जैन याने हात दाखवून अडवण्यात आली त्यावेळी पवनराजे हे मागील सीटवर झोपले होते, राजे यांनी उजव्या दरवाज्याची काच खाली घेताच दिनेश तिवारी व पिंटू सिंग या मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या. कोणताही पुरावा व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार राहू नये म्हणुन हल्लेखोर असलेल्या 2 शूटरनी समद काझी यांना सुद्धा एक गोळी मारली, गोळी आरपार गेल्याने दोघांचाही जागेवरच मृत्यु झाला. पवनराजे यांच्यावर 2 गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी डोक्यात लागली तर काझी यांच्यावर एक गोळी झाडली. दोघे मेल्याची खात्री झाल्यावर शस्त्र व इतर पुरावे नष्ट करून आरोपी फरार झाले व मोहन शुक्ला याला काम केल्याचे फोन करून सांगितले.
पारसमल जैन व पिंटू सिंग 4 जूनला राजस्थानला गेले. दुसऱ्या दिवशी जैन याने शुक्ला याला फोन करून पैशाची मागणी केली, 15 दिवसांनी सतीश मंदाडे व मोहन शुक्ला हे दोघे डॉ पद्मसिंह पाटील यांच्या कुलाबा येथील घरी गेले व तिथून त्यांच्याकडून पैसे घेऊन आले. शुक्ला याने 25 लाख जैन याला दिले. त्यातील 5 लाख रुपये राजस्थान येथील घरी ठेवून 20 लाख घेऊन उत्तर प्रदेशला गेला, तिथे 20 लाख कैलाश यादव याला दिले. त्याने 5 लाख स्वतःला ठेवून 15 लाख छोटे पांडे यांच्याकडे दिले. 15 लाख पैकी 7 लाख पांडे याने स्वतःला ठेवले व उर्वरित 8 लाख पैकी प्रत्येकी 4 लाख तिवारी व पिंटू सिंग याला दिले. अश्या प्रकारे आरोपीनी 25 लाखांच्या सुपारीची ‘वाटणी’ केली.
पवनराजे यांची हत्या करण्यासाठी पारसमलने फेब्रुवारी 2005 मध्ये लातुर येथे जाऊन त्यांच्या घरी रेकी केली त्यानंतर तो धाराशिवला आला मात्र डाव फसल्याने तब्बल 16 महिने कट रचून, पाळत ठेवून 3 जुन 2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांची कळंबोली येथे भरदिवसा गोळ्या घालुन हत्या करण्यात आली. हत्याकांड नंतर 3 वर्षांनी 6 जुन 2009 रोजी माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांना खासदार पदावर असताना सीबीआयने अटक केली. पारसमल जैन व दिनेश तिवारी यांनी न्यायाधीश श्रीमती एस बी महाले यांच्या कोर्टात 29 मे 2009 रोजी दिलेल्या जबाबानंतर हत्याकांडाचा उलघडा झाला.
मृत्युदंड द्या, दुर्मिळातील दुर्मिळ कृत्य – शांत डोक्याने दुहेरी हत्या
डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 आरोपीनी शांत डोक्याने 16 महिने रेकी करून नियोजनबद्ध कट रचून हे दुहेरी हत्याकांड केले, संशयाच्या पलीकडे जाऊन सर्व पुरावे असल्याने व आरोप सिद्ध होत असल्याने आरोपीना मृत्यु दंडाची शिक्षा करावी अशी विनंती आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांनी कोर्टास केली आहे. त्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टातील माची सिंग व इतर विरुद्ध पंजाब सरकारच्या 20 जुलै 1983 च्या निकालाचा दाखला दिला आहे. थंड डोक्याने कट रचणे, एका पेक्षा जास्त व्यक्तींचा खुन करणे हे दुर्मिळातील दुर्मिळ घटना आहे. खासदार ओमराजे व डॉ जयप्रकाश राजे यांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याचे सांगितले. सीबीआय तपासात खुन कोण व का केला हे समोर आले आहे.









