काडी, तुराट्या, धसकटे ,भुस्कटापासुन डिझेल निर्मिती – शेतकरी होणार समृद्ध, परकीय चालनाची होणार बचत
धाराशिव – समय सारथी
शेतातील कचऱ्यापासून तयार नवीकरणीय डिझेलचा प्रायोगिक वापर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील वाहनात करावा असा सल्ला आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिला आहे. मी वापरले, तुम्ही पण अनुभव घ्या, वाहनात वापर करून अनुभव विषद करावा जेणे करून इतरांना देखील यामुळे प्रोत्साहन मिळेल असे आवाहन त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. आमदार पाटील यांनी पालकमंत्री सरनाईक यांच्या परिवहन विभागाला आवाहन केले आहे.
ग्रीनज्युल्स प्रा.लि. या कंपनीने ‘अभिलाषा बायो फ्युल’ या नावाने कृषी कचरा ज्यात विविध पीक काढणीनंतर उरणारे काडी, तुराट्या, धसकटे ,भुस्कट आणि अन्य अवशेष पासून नवीकरणीय डिझेल तयार केले असून एआरएआय (The Automotive Research Association of India) कडून प्रमाणित करून घेण्यात आले आहे. या नवीकरणीय डिझेलचा वापर मी वापरात असलेल्या वाहनात करून मी प्रात्यक्षिक घेतले आहे, तुम्ही पण घ्या असे आवाहन केले आहे.
डिझेलचा वापर वाढविल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून देशाच्या परकीय चलनात देखील मोठी बचत होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, मूल्यवर्धित शेतीला चालना देणे आणि देशाला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्याचा संकल्प केला आहे. कृषी अवशेषांपासून तयार होणारे नवीकरणीय डिझेल हा त्या संकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे.
महाराष्ट्रातील ग्रीनज्यूल्स या कंपनीसोबत या नाविन्यपूर्ण विषयावर काम सुरू असून शेतीतील टाकाऊ अवशेष व कचऱ्यापासून तयार केलेले नवीकरणीय डिझेल वापराच्या दृष्टीने पारंपरिक डिझेल इतकेच प्रभावी असल्याचे प्राथमिक चाचण्यांमधून स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर वायू प्रदूषण कमी करण्यासाठीही नवीकरणीय डिझेल हा प्रभावी पर्याय ठरणार आहे. ग्रीनज्युल्स प्रा लि.या कंपनीने ‘अभिलाषा बायोफ्युल’ या नावाने शेतातील कचऱ्यापासून तयार केलेल्या नवीकरणीय डिझेलचा प्रायोगिक वापर कार्यालयीन वाहनात करावा असे त्यांनी म्हणटले आहे.












