मतपत्रिकेवर उमेदवाराचा फोटो तरीही हवा सहायक, छानणी सुरु – विधान परिषद निवडणुक
धाराशिव – समय सारथी
विधान परिषदेच्या उस्मानाबाद बीड व लातुर या स्थानिक स्वराज मतदार संघासाठी 18 जुनला मतदान होणार असुन 988 पैकी जवळपास 41 मतदारांनी सहायक देण्याची मागणी जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडे केली आहे. हे 41 मतदार निरक्षर असुन त्यांना अक्षर ओळख नसल्याने कोणत्या उमेदवाराला मतदान करायचे याचे मतपत्रिकेवरील नाव वाचण्यासाठी त्यांनी सहायक देण्याची मागणी केली आहे. हे मतदार लातुर व बीड जिल्ह्यातील असुन त्यात नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश आहे.
विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह मानले जाते. उस्मानाबाद बीड लातुर मतदार संघातील काही मतदार यांना वाचता येत नसल्याचा त्यांचा दावा आहे, त्यामुळे त्यांनी मतदान करताना सहायक देण्याची मागणी केली आहे. जवळपास 41 अर्ज प्राप्त झाले असुन जिल्हा प्रशासन या अर्ज व त्यांनी केलेल्या दाव्यांची पडताळणी करीत आहे, अर्जाची छानणी सुरु आहे.
मतपत्रिकेवर उमेदवाराचे नाव व पक्ष हे इंग्लिश व मराठीत असते शिवाय त्यांचा फोटो असतो. मतदार निरक्षर दृष्टीदोष, अंध असेल तर त्याला सहायक देण्याची तरतूद आहे मात्र काही जण त्याचा गैरफायदा घेतात त्यामुळे प्रशासन देखील सावध भुमिका व खबरदारी घेत आहे. काही जण इंग्लिश व मराठी सही करतात मात्र अक्षर ओळख नाही असा दावा करतात. लिहता, वाचता येत नसले तरी उमेदवार फोटो असल्याने कोणाला मतदान करायचे हे सहज कळू शकते मात्र तरीही काहींनी सहायक हवा आहे.
स्थानिक स्वराज निवडणुक लढवताना त्यांनी सादर केलेले शपथ पत्र व त्यातील शैक्षणिक पात्रता, मीटिंग प्रोसिडिग याची पडताळणी होणे गरजेचे आहे. त्यातून सत्य उघड होऊ शकते. विधान परिषद निवडणुक ही घोडे बाजारसाठी ओळखली जाते, कोणाला मतदान केले यावर विश्वास बसावा यासाठी अनेक क्लुप्त्या वापरल्या जातात त्यापैकी ही एक असावी अशीही चर्चा आहे. निरक्षर असलेल्या मतदार यांना साक्षर करण्यासाठी सरकारने शिक्षा वर्ग किंवा उपाय योजना करण्याची मागणी होता आहे.











