धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील मुख्य जिल्हा व सत्र न्यायालयात प्रलंबित असलेला मोटार अपघात नुकसान भरपाईचा दावा लोकअदालतीमध्ये यशस्वीरीत्या निकाली निघाला. मोटार अपघात न्यायाधीकरण, धाराशिव यांनी अर्जदारांना 24 लाख रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर केली आहे. या निर्णयामुळे अपघातात कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.
मनिषा सुरेश यादव व त्यांच्या मुलांनी (प्रियांका, समर्थ आणि सार्थक यादव) व्हिआरएल लॉजिस्टिक्स प्रा. लि. आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्या विरोधात नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला होता. अर्जदारांच्या पतीचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला होता. कुटुंबातील एकमेव कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा आणि मुलांच्या भविष्याचा मोठा प्रश्न उभा राहिला होता.
सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा न्यायाधीश आर के खोमणे आणि जिल्हा न्यायाधीश ए एस अवटे यांनी या प्रकरणात निर्णय दिला. लोकअदालतीमध्ये दोन्ही पक्षांच्या सहमतीने हा दावा तडजोडीसाठी ठेवण्यात आला होता. न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली आणि दोन्ही पक्षांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे 24 लाख रुपये मोबदला देण्याचे निश्चित होऊन प्रकरण निकाली काढण्यात आले.
या प्रकरणामध्ये अर्जदारांच्या वतीने ॲड एम बी माढेकर, ॲड धर्मराज सरडे आणि ॲड विशाल बारकुल यांनी प्रभावीपणे कायदेशीर बाजू मांडली. युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीच्या वतीने ॲड अमोल कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.
पतीच्या अपघाती निधनामुळे यादव कुटुंबावर मोठे संकट ओढवले होते. मात्र, लोकअदालतीच्या माध्यमातून मिळालेल्या या 24 लाखांच्या नुकसान भरपाईमुळे कुटुंबाला मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून, मुलांच्या शिक्षणासाठी व भविष्यासाठी हा मोबदला अत्यंत मोलाचा ठरणार आहे.












