धाराशिव – समय सारथी
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने चालवले जाणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय आता पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने या महाविद्यालयाच्या शासनाकडे हस्तांतरण करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे या भागातील शैक्षणिक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार असून आता शासकीय सक्षमीकरण होणार असुन तुळजापूरच्या शैक्षणिक प्रगतीचा नवा अध्याय अशी प्रतिक्रिया आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. मंदीर संस्थानची आणखी एक संपत्ती यानिमित्ताने शासनाकडे गेली आहे, मंदीर संस्थान प्रशासनाची अकार्यक्षमता यातुन दिसुन आली.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 8 जुलै 25 रोजी बैठक झाली होती. त्यात तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याच्या अनुषंगाने तसेच ही कार्यवाही सुकरपणे पार पडावी याकरिता 5 सदस्यीय तज्ञांची समिती गठित करण्यात आली होती. समितीने ऑगस्ट 25 मध्ये सादर केलेल्या अहवालानुसार आता उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाला आता ‘शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय’ असा दर्जा मिळणार आहे. यामुळे महाविद्यालयाच्या सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
शासनाच्या थेट नियंत्रणामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होईल, ज्याचा वापर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केला जाईल. महाविद्यालयात आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय आणि अद्ययावत संगणक कक्ष उपलब्ध होतील. शासकीय दर्जा मिळाल्यामुळे या ठिकाणी अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापकांची नियुक्ती होण्यास मदत होईल. शासकीय नियमांनुसार शैक्षणिक शुल्कात सवलत मिळणार असल्याने ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे अभियांत्रिकी शिक्षण घेणे सहज शक्य होणार आहे तसेच महाविद्यालयाचा दर्जा सुधारल्यामुळे मोठ्या कंपन्यांमार्फत होणाऱ्या ‘कॅम्पस प्लेसमेंट’मध्ये वाढ होईल, ज्यामुळे स्थानिक तरुणांना नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील असे आमदार पाटील म्हणाले.
तुळजापूर आणि संपूर्ण धाराशिव जिल्ह्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. आतापर्यंत येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षणासाठी पुणे, छत्रपती संभाजीनगर किंवा मुंबईसारख्या शहरांकडे धाव घ्यावी लागत होती. मात्र, आता आपल्याच परिसरात जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा असलेले शासकीय महाविद्यालय उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. शासनाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय हे मराठवाड्यातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपास येईल, असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
हा निर्णय म्हणजे दुग्धशर्करा योग: आमदार पाटील
एकीकडे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांचा लवकरच शुभारंभ होत आहे. धाराशिव-तुळजापूर रेल्वेमार्गाचे कामही अंतिम टप्प्यात असून आता तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासकीय होण्याचा निर्णय म्हणजे दुग्धशर्करा योग आहे. श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासकीय करण्यासाठी आपला सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू होता. या निर्णयामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणाला बळकटी मिळणार असून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण तर मिळणार आहेच, त्याचबरोबर तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या खर्चात देखील कपात होणार आहे. मराठवाड्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगप्रमाणे वेतन मिळण्याचा मार्गही सुकर होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील व मंत्रिमंडळाचे विशेष आभार
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी या विषयावर सातत्याने अनेक बैठका घेत, विविध प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणींवर सखोल चर्चा करून मार्ग काढला. तसेच अनेक अडचणी आणि प्रक्रियात्मक गुंतागुंत असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाला सकारात्मक भूमिका घेत अंतिम मंजुरी दिली. तुळजापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी घेतलेल्या या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच राज्य मंत्रिमंडळाचे मनःपूर्वक आभार मानले.











