धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडात कोर्टाने निकालाची तारीख जाहीर केली असुन 14 मे रोजी निकाल सुनावला जाणार आहे, या हत्याकांडाला 20 वर्ष झाले आहेत. मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस आर नावंदर यांच्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. राज्याचे माजी गृहमंत्री तथा माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जन यात आरोपी असुन निकालाकडे लक्ष लागले आहे. पारसमल जैन बादला हा माफीचा साक्षीदार असुन त्याच्या जबाब भोवती हे संपुर्ण प्रकरण आहे. 20 एप्रिलच्या सुनावणीवेळी डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह 7 आरोपी हजर होते.
महाराष्ट्र पोलिस, सीआयडी व त्यानंतर सीबीआय अश्या 3 तपास यंत्रणानी याचा तपास केला असुन सुनावणी दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 128 साक्षीदार तपासण्यात आले. 16 महिने कट रचून 25 लाखांची सुपारी देऊन दुहेरी हत्याकांड केल्याचा सीबीआयचा दावा आहे, यासाठी 2 शुटर व परदेशी शस्त्र यात वापरण्यात आले, 4 जुलै 2011 पासून गेली 14 वर्ष पासून सुनावणी सुरु आहे. डॉ पाटील यांच्या वतीने 1 हजार 250 पानाचे लेखी म्हणणे मांडले आहे, ज्यात पवनराजे यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत.
पवनराजे यांची हत्या करण्यासाठी पारसमलने फेब्रुवारी 2005 मध्ये लातुर येथे जाऊन त्यांच्या घरी रेकी केली त्यानंतर तो धाराशिवला आला मात्र डाव फसल्याने तब्बल 16 महिने कट रचून, पाळत ठेवून 3 जुन 2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांची कळंबोली येथे हत्या करण्यात आली. हत्याकांड नंतर 3 वर्षांनी 6 जुन 2009 रोजी माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांना खासदार पदावर असताना सीबीआयने अटक केली.
कै पवनराजे यांची हत्या ज्या शस्त्रानी केली होती ती शस्त्र परदेशी बनावटीची होती त्या बंदुकीवर मेड इन युएसए, चायना असे लिहले होते. पवनराजे यांची हत्या केल्यानंतर कोणताही पुरावा व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार राहू नये म्हणुन हल्लेखोर असलेल्या 2 शूटरनी समद काझी यांना सुद्धा एक गोळी मारली, गोळी आरपार गेल्याने दोघांचाही जागेवरच मृत्यु झाला. पवनराजे यांच्यावर 2 गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी डोक्यात लागली तर काझी यांच्यावर एक गोळी झाडली.
राजकीय कारकीर्द व अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे व मोहन शुक्ला यांनी कट रचत 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचा ठपका सीबीआयने दोषारोपपत्रात ठेवला आहे. माजी गृहमंत्री तथा माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील, पारसमल जैन बादला, शुटर दिनेश तिवारी, मुंबईतील नगरसेवक मोहन शुक्ला, लातुर येथील सतीश मंदाडे, शुटर पिंटू सिंग, उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव, माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी व छोटे पांडे हे 9 जण दुहेरी हत्याकांडात संशयित आरोपी आहेत.
एकामागून एक असे 3 खोटे गुन्हे नोंद होत असल्याने पारसमल जैन याने मुलगी वर्षा हिला सीबीआयला पत्र लिहून हत्याकांडाची माहिती दिली, त्यानुसार तिने 27 एप्रिल 2009 सीबीआयला पत्र दिले. डॉ पाटील यांच्या वतीने काही शब्द व आश्वासन देऊन वाऱ्यावर सोडले, शिवाय उलट खोट्या गुन्ह्यात अडकवल्याने तो फुटला व खळबळजनक हत्याकांडाचा खुलासा केला. मुंबईचे तत्कालीन सह पोलिस आयुdक्त राकेश मारिया यांच्यासह त्यांच्या टीमवर गंभीर आरोप केले आहेत. अवैध कोठडीत ठेवणे, कबुली दिलेली असताना ती लपवून ठेवणे, खोट्या गुन्ह्यात अडकवणे यासह अन्य आरोप जैनने कोर्टात केले, त्यावर कोर्ट काय म्हणते याकडे लक्ष लागले आहे.
सीबीआयचे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी ऋषीराज सिंग, पोलीस अधीक्षक तथा आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकुर व त्यांच्या टीमची भुमिका महत्वाची राहिली. पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांच्या वतीने ऍड पी एम गवाड हे तर डॉ पाटील यांच्या वतीने ऍड भुषण महाडिक, ऍड रोहित मालपाणी हे तर इतरांच्या वतीने ऍड नेहा सुळे बाजु मांडत आहेत.











