महाघोटाळा – मयत व्यक्तीच्या नोंदी, धाराशिवचा ‘तो’ नगराध्यक्ष कोण ? मंत्र्यांची कबुली, चौकशीचे आदेश
धाराशिव – समय सारथी
बीडसह धाराशिव जिल्ह्यातील बोगस कामगार नोंदणीचा विषय आमदार सुरेश धस यांनी विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी सूचनेत मांडत महाघोटाळ्याची पोलखोल केली. मयत व्यक्तीच्या नोंदी कामगार म्हणुन करण्यात आल्याचे त्यांनी पुराव्यासह मांडले, बोगस बांधकाम कामगार नोंदी करण्यात आल्या असुन त्यांच्या नावाने योजना लाटल्या असल्याचे ते म्हणाले. या सर्व मुद्याची चौकशी सचिव दर्जाच्या अधिकारी मार्फत करण्याचे आश्वासन कामगार मंत्री ऍड आकाश पांडुरंग फुंडकर यांनी दिले. दैनिक समय सारथी वृत्तपत्राने बोगस कामगार नोंदणीचा मुद्दा उपस्थितीत केला होता, त्यानंतर आता ठोस कारवाईच्या दिशेने सुरुवात झाली आहे.
मयत व्यक्तीच्या नोंदी कामगार म्हणुन करण्यात आल्या, मयत झालेल्या व्यक्ती जिवंत झाल्या त्यानंतर त्यांनी वरून खाली येऊन 100 दिवस काम केले व त्यांना तसे प्रमाणपत्र देण्यात आले, नंतर त्यांची कामगार म्हणुन नोंद झाली व योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा ते मयत झाले, यासाठी त्यांनी बीड येथील एक उदाहरण पुराव्यासह दिले. बोगस कागदपत्र व नोंदी वापरून अनेक ठिकाणी बोगस कामगार नोंदणी झाल्याचे
धाराशिव येथील जिल्हा कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे व अजय काशीद या दोन अधिकाऱ्यांची जोडीने मोठा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला. धाराशिव नगर परिषदेचे एक माजी नगराध्यक्ष बांधकाम कामगार असल्याचा गौप्यस्फ़ोट आमदार धस यांनी केल्याने तो नगराध्यक्ष कोण ? याच्या चर्चेला उधाण आले आहे.
बोगस बांधकाम कामगार नोंदणी व विविध योजनेच्या लाभार्थी यांची सचिव दर्जाच्या अधिकारी मार्फत चौकशी करावी, गुन्हे नोंद करून आर्थिक वसुली करावी अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. बीड जिल्ह्यात दुबई येथील बुर्ज खलिफा येथे तर अमेरिका येथील व्हाईट हाऊस येथे कामगार असल्याच्या व काम केल्याच्या नोंदी घेतल्या असुन त्या आधारे बांधकाम कामगार नोंदणी झाल्याचा धक्कादायक खुलासा केला.
काही ठिकाणी बोगस बांधकाम कामगार नोंदणी झाल्याचे मंत्री फुंडकर यांनी सभागृहात मान्य केले. कामगार नोंदणी आधी ऑफलाईन होती त्यावेळी असे प्रकार मोठ्या प्रमाणात झाले, हे टाळता यावे यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु केली. महाराष्ट्रत बोगस एजेंट खोटे कागदपत्रे तयार करत आहेत, खोटे सही शिक्के तयार करीत आहेत. नगर परिषदेचे खोटे कागदपत्रे तयार होत असणे ही गंभीर बाब आहे. मयताच्या टाळूवरील लोणी खाल्ल्याचा हा प्रकार आहे. नोंदणी अधिकारी असो नप अधिकारी असो कोणालाही यात सोडले जाणार नाही. एक स्वतंत्र अधिकारी नेमून याची चौकशी करू यात जो जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू असे आश्वासन पटलावर दिले.
कामकार कल्याणकारी महामंडळात दलालाची लॉबी सक्रीय असुन काही अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करीत सोईनुसार नोंदणी करून लाभ दिला जात आहे. बांधकाम कामगार नोंदणी करताना अनेक कागदपत्रे बोगस जोडली आहेत. धाराशिव जिल्ह्यात जवळपास 31 हजार कामगारांची नोंदणी आहे. बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत, कामगारांना संसार उपयोगी साहित्य देण्यासह बांधकामाच्या अनुशंगानने आवश्यक साहित्य मोफत वाटप केले जाते. 30 पेक्षा अधिक योजना महामंडळाकडुन राबविल्या जात असुन त्यात शिक्षण, विवाह, घर व जीवनमान सुधारणे, कुटुंब व सामाजिक योजनाचा समावेश आहे, या सर्व चौकशीच्या रडारवर आहेत.











