धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील बांधकाम कामगार यांच्या नावाने सुरु असलेल्या विविध शासकीय योजनात मोठा अपहार झाला असुन कामगार नोंदणी व त्यांना दिलेल्या योजनेच्या लाभाचे ऑडिट करण्याची मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे. कामगारांच्या कल्याणासाठी असलेल्या विविध योजनाचे सामाजिक लेखापरीक्षण करून आयएएस दर्जाच्या अधिकारी मार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. धाराशिव शहरात नुकतेच साहित्य वाटप योजनेत सावळा गोंधळ पहायला मिळाला आहे.
खरे कामगार यापासून वंचित असुन बोगस नोंदणी झाली असुन लाखो रुपये हडप केले जात आहेत. कामकार कल्याणकारी महामंडळात दलालाची लॉबी सक्रीय असुन अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करीत सोईनुसार नोंदणी करून लाभ दिला जात आहे. बांधकाम कामगार नोंदणी करताना अनेक कागदपत्रे बोगस लावली गेल्याचा संशय आहे. त्या कागदपत्रे यांची तपासणी करणे गरजेचे आहे. धाराशिव जिल्ह्यात जवळपास 31 हजार कामगारांची नोंदणी आहे.
राज्य शासन कल्याणकारी महामंडळामार्फत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत, कामगारांना संसार उपयोगी साहित्य देण्यासह बांधकामाच्या अनुशंगानने आवश्यक साहित्य मोफत वाटप केले जाते. 30 पेक्षा अधिक योजना महामंडळाकडुन राबविल्या जात असुन त्यात शिक्षण, विवाह, घर व जीवनमान सुधारणे, कुटुंब व सामाजिक योजनाचा समावेश आहे.
बांधकाम कामगारांना पेटी, स्टीलची टाकी, पातेले, परात, वाटी, ग्लास, बॅग, हॅन्ड ग्लोज, फायबर टोपी, गम बूट, रबरी हात मोजे व शैक्षणिक बॅग यासह इतर साहित्य वाटप केले जाते. कंत्राटदार व दलालांकडून मोफतच्या या साहित्यासाठी हजार ते दीड हजार रुपये गोळा केल्याचा गंभीर प्रकार धाराशिव शहरातील तालीम गल्ली, जुने भारत विद्यालय या भागात उघडकीस आला आहे.
काही दलालांनी बांधकाम मजूर म्हणून नोंद झालेल्या या भागासह परिसरातील मजुरांची यादी अगोदरच मिळवून त्यांना गाठत साहित्य मिळवून देतो म्हणून प्रत्येकाकडून एक ते दीड हजार रुपये उखळल्याचे कळते. यादी जाहीर होण्यापूर्वीच काही दलालांनी तुमचे यादीत नाव घेतो म्हणून काही जणांकडून 5 हजार रुपयांपर्यंतची रक्कमही उखळल्याचे सांगण्यात आले. हा सर्व गंभीर प्रकार पाहता या महामंडळावर व कंत्राटदारावर दलालांचेच नियंत्रण असल्याचे दिसून येते.











