धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिर विकास कामाबाबत पालकमंत्री प्रतापराव सरनाईकांची यांनी आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी कामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करण्याचे निर्देश अधिकारी यांना दिले. विकासकामांना भव्यतेची आणि दिव्यतेची नवी उंची देण्याचा निर्धार व्यक्त केला. श्रद्धा,विकास आणि सुशासन यांचा सुंदर संगम घडवून श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर परिसराला नवे वैभव प्राप्त करून देऊ असे सरनाईक म्हणाले.
कोट्यवधी भाविकांच्या अखंड श्रद्धेचे केंद्र असलेल्या या तीर्थक्षेत्राचा विकास केवळ आजचाच नव्हे,तर पुढील शंभर वर्षांचा विचार करून दूरदृष्टीने आणि उत्कृष्ट दर्जाने व्हावा,अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.बैठकीत तुळजापूर येथील श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
भाविकांच्या सोयी-सुविधा वाढविण्यासाठी हुडको पार्किंग परिसरात उभारण्यात येणाऱ्या भाविक सुविधा केंद्र, आधुनिक भक्तनिवास,व्यावसायिक संकुल,बहुउद्देशीय सभागृह आणि विस्तीर्ण वाहनतळ अशा विविध प्रकल्पांचा समावेश असलेल्या सुमारे 582 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी विकास आराखड्याची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी सादर केली. यासोबतच याकामासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन आणि निविदा प्रक्रियेच्या प्रगतीचा देखील आढावा घेण्यात आला.
तुळजाभवानी मंदिराचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांचा प्रकल्प नसून तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अस्मितेशी जोडलेला आहे. त्यामुळे या प्रकल्पात गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये,यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्मितीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुळजाभवानी मंदिर परिसराचा विकास भव्य, आकर्षक आणि शाश्वत पद्धतीने करावा. देशातील नामांकित विकासक आणि तज्ज्ञ संस्थांचा सहभाग घेऊन या प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्याचेही निर्देश सरनाईक यांनी दिले.
तुळजाभवानी मातेला दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात, त्यामुळे भाविकांना अधिक सुटसुटीत,सुरक्षित आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.योग्य नियोजन,काटेकोर अंमलबजावणी आणि उच्च दर्जाची कामे यामुळेच या तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास साध्य होईल, असेही पालकमंत्री सरनाईक यांनी नमूद केले.
धाराशिव येथे उभारण्यात येणाऱ्या 500 खाटांच्या आधुनिक जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाची प्रगती, धाराशिव व परंडा येथील न्यायालयीन इमारतीचे बांधकाम,तुळजापूर येथील व्हीव्हीआयपी विश्रामगृह तसेच विविध रस्ते विकास प्रकल्पांची स्थिती यावर चर्चा झाली. नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी सर्व प्रकल्प नियोजित वेळेत आणि उच्च दर्जाने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री सरनाईक यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीस जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस.व्ही.बंडे, महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय आडे,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता शैलेंद्र चौहाण,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ धनंजय चाकूरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवराम केत यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.












