धाराशिव – समय सारथी
सत्ता महत्त्वाची असली, तरी पक्षाची एकजूट त्याहून महत्त्वाची आहे. प्रसंगी आम्ही विरोधी बाकांवर बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, असा इशारा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिला. स्वार्थी राजकारणातून शिवसेनेतील एक गट आमच्यासोबत असल्याचा प्रचार करून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. हे कदापी सहन केले जाणार नाही. सत्ता हे ध्येय असले तरी तत्त्वांशी तडजोड नाही. दबाव, आमिष किंवा अफवांच्या आधारे शिवसेनेची एकजूट ढळणार नाही, असे ते म्हणाले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकानंतर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाम शब्दांत भूमिका स्पष्ट केली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुका शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकत्र लढवल्या होत्या. त्यामुळे पुढेही एकत्रित सत्ता स्थापनेबाबत चर्चा सुरू असतानाच, काही मंडळींकडून माध्यमांमध्ये दिशाभूल करणाऱ्या बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला.
आमदार तानाजी सावंत यांना वेगळे ठेवून शिवसेनेत मतभेद असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न काही जण करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. आमचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना अखंड, अभेद्य आणि सशक्त आहे. कोणत्याही अफवांना आम्ही बळी पडणार नाही,असे ते म्हणाले.
सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनामध्ये मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादीच्या अध्यक्षा श्रीमती सुनिता ताई पवार यांच्याशी चर्चा करून पुढील राजकीय रणनीती ठरवणार आहोत, असे सांगताना सरनाईक यांनी तथाकथित बोलघेवड्या स्वयंभू नेत्यांना पक्षाच्या पुढील रणनीती बाबत भाष्य न करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी अफवांकडे दुर्लक्ष करून पक्षनेतृत्व जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून, संघटन बळकट करण्यावर भर द्यावा, असे आवाहन करत सरनाईक यांनी आगामी राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना अधिक सक्षमपणे उभी राहील, असा निर्धार व्यक्त केला.











