धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने 9 आरोपीना जामीन मंजुर केला आहे. संगीता वैभव गोळे, माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर व चंद्रकांत उर्फ बापु कणे, माजी सभापती शरद जमदाडे, माजी सभापती पुत्र विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे,अमित उर्फ चिम्या अरगडे, संदीप राठोड, राहुल कदम परमेश्वर,गजानन हंगरगेकर या 9 जणांना कोर्टाने सशर्त जामीन मंजुर केला आहे. न्यायमुर्ती संजय देशमुख यांनी असे आदेश दिले आहेत.
ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात 38 आरोपी असून त्यापैकी 35 आरोपीना अटक करण्यात पोलिसांना यश आले असुन 3 आरोपी फरार आहेत. मुंबई येथील अतुल अग्रवाल हा मोकाट असुन मुख्यमंत्री व विधिमंडळात नाव येऊनही पोलिसांना त्याच्या पर्यंत पोहचता आले नाही, त्याच्यावर वरदहस्त कोणाचा ? आरोपीनी ड्रग्जमधुन कमावलेली संपत्ती जप्त करणे, मकोका बाबतही कोणतीही निर्णय झालेला नाही तर आमदार कैलास पाटील यांच्या विधीमंडळातील उत्तर लीकचे कनेक्शन सापडले नाही यासह अन्य बाबी अजूनही तश्याच आहेत.
धाराशिव पोलिसांनी 10 हजार 744 पानांचे दोषारोपपत्र धाराशिव कोर्टात सादर केले असुन तपास सुरु असल्याने पुरवणी दोषारोप पत्र दाखल करणे आहे. मुंबई येथील मुख्य तस्कर वैभव गोळे, इंद्रजीतसिंह उर्फ मिटू ठाकुर व विशाल सोंजी हे आरोपी फरार आहेत, त्यातील गोळे व ठाकूर हे गुन्हा नोंद झाल्यापासून जवळपास गेली 7 महिनेपेक्षा अधिक काळ फरार आहेत, फरार राहण्यात त्यांना आजवर यश आले आहे.
तामलवाडी येथे 14 फेब्रुवारी रोजी धाराशिव पोलिसांनी कारवाई करीत ड्रग्ज पकडले त्यानंतर एकामागून एक खुलासे व आरोपी निष्पन्न होत त्यांना अटक झाली. 9 आरोपीना कोर्टाने 50 हजार रुपयांच्या जाचमुचलक्यावर जामीन दिला आहे. आरोपीनी शासकीय साक्षीदार यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये व पुराव्याशी छेडछाड करू नये. या गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत आरोपीना धाराशिव तहसील हद्दीत येता येणार नाही, त्यांना बंदी असेल. कोर्टाने दिलेली तारीख व सुनावणी वेळी त्यांना येण्याची मुभा असेल. आरोपीनी तत्सम म्हणजे अश्या प्रकारच्या किंवा कोणत्याही बेकायदेशीर कृतीत सहभागी होऊ नये अन्यथा जामीन रद्द केली जाईल.
आरोपीनी जर यातील कोणत्याही अटीचा भंग केला तर तपास अधिकारी व संबंधित पोलिस ठाणे किंवा सरकार यांना आरोपीचा जामीन रद्द करण्याचा अर्ज विशेष न्यायालय येथे करता येईल. विशेष न्यायालयाला स्वतःहून सुद्धा जामीन रद्द करण्याची कारवाई करता येईल व असा जामीन रद्द करण्याचा अर्ज आला तर त्यावर कोर्टाला निर्णय घेता येईल असे आदेशात नमुद आहे.
पोलिस अधीक्षक रितु खोखर, तत्कालीन पोलिस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर यांनी तपास केला. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख, ऍड सचिन सूर्यवंशी यांनी वेळोवेळी सरकारच्या वतीने कोर्टात सक्षम बाजु मांडली. स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी सुदर्शन कासार यांनी गुन्हा नोंद केला, गुन्हा, आरोपी निष्पन्न व अटकेत स्थानिक गुन्हे शाखेचे मोठे योगदान आहे.
अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना 45 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 59 पुड्या ड्रग्जसह 14 फेब्रुवारीला तामलवाडी येथे रंगेहात अटक करण्यात आली त्यांनंतर याचे गांभीर्य व अटक सत्राला सुरुवात झाली. ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबई महिला तस्कर संगीता गोळेला 22 फेब्रुवारीला अटक करण्यात आली.सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला 28 फेब्रुवारी, राहुल कदम-परमेश्वर याला 24 मार्चला, गजानन हंगरकर याला 26 मार्चला अटक,16 मे रोजी माजी उपसभापती शरद जमदाडे यांना तर 22 जुन रोजी माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर उर्फ मेंबर यांना अकलूज सोलापूर येथून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे यांना पुणे येथून 21 जुलै रोजी अटक केली. हे आरोपी अटकेपासून जेलमध्ये होते, आता त्याची सुटका झाली आहे.












