धाराशिव – समय सारथी
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धाराशिव जिल्हा परिषदेसाठी विविध विकास कामांसाठी 275 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना ताई पाटील यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली. पाटील यांनी केलेल्या अभ्यासपुर्ण सादरीकरणाचे पालकमंत्री सरनाईक यांनी कौतुक केले.
शिक्षण विभागांतर्गत शाळा दुरुस्ती, नवीन वर्गखोली बांधकामे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, मुलींसाठी स्वच्छतागृहे, संरक्षक भिंती तसेच सीसीटीव्ही यासाठी 73 कोटी 61 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. आरोग्य विभागासाठी औषधे व प्रयोगशाळा साहित्य खरेदी, चार प्राथमिक आरोग्य केंद्रांवर प्रत्येकी 14 निवासी इमारती बांधकाम करून निवासी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देणे तसेच चार रुग्णवाहिका खरेदी यासाठी एकूण 11 कोटी 83 लाख रुपयांची मागणी करण्यात आली.
पशुसंवर्धन विभागांतर्गत 4 नवीन पशुचिकित्सालये व 12 दवाखान्यांच्या दुरुस्तीसाठी 1.42 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. बांधकाम विभागासाठी ग्रामीण मार्गांसाठी 50 कोटी रुपये व इतर जिल्हा मार्गांसाठी 20 कोटी रुपये मागणी करण्यात आली, तर ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. लघुपाटबंधारे विभागांतर्गत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कोल्हापुरी बंधारे, सिंचन प्रकल्प व तलाव दुरुस्ती तसेच भूसंपादनासाठी 21.97 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली.
महिला व बाल कल्याण विभागांतर्गत ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी अंगणवाडी बांधकामाची मागणी होत असून पहिल्या टप्प्यात 66 अंगणवाड्यांसाठी प्रति अंगणवाडी 12 लाख प्रमाणे 8 कोटी रुपये तसेच महिलांसाठी 100 महिला भवनांसाठी प्रति भवन 15 लाख प्रमाणे 15 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. ग्रामपंचायत विभागांतर्गत जनसुविधा योजनेसाठी 10 कोटी रुपये, नागरी सुविधांसाठी 5 कोटी रुपये व मुख्यमंत्री ग्रामसमृद्धी योजनेसाठी 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत हातपंप काढून विद्युत पंप बसविण्यासाठी 1 कोटी रुपये तसेच सोलर सिस्टम बसविण्यासाठी 5 कोटी रुपये मागणी करण्यात आली. तसेच तेर व माकणी प्रकल्पाच्या महावितरण कंपनीच्या थकीत वीजबिलासाठी 3.80 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. उमेद उपक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यासाठी एक मोबाईल व्हॅन या प्रमाणे आठ व्हॅनसाठी 2 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. ग्रामीण भागातील तरुणांना क्रीडा प्रोत्साहन मिळावे यासाठी क्रीडांगण विकासासाठी 5 कोटी रुपये व व्यायामशाळा बांधकामासाठी 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. दलित वस्तीतील विविध विकास कामांसाठी 27 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली.
या सर्व मागण्यांचे सविस्तर सादरीकरण करताना ग्रामीण भागातील जनतेला याचा कसा फायदा होईल हेही स्पष्ट करण्यात आले. या सादरीकरणाचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तोंडभरून कौतुक केले.











