धाराशिव – समय सारथी
धाराशिव, बीड ते छत्रपती संभाजीनगर या 240 किलोमीटर अंतराच्या नव्या रेल्वेमार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सर्वेक्षणास मंजुरी दिली असून सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असल्याची माहिती आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली आहे.
धाराशिवसह मराठवाड्याच्या विकासासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. हा रेल्वेमार्ग साकार झाल्यास उद्योग, व्यापार, शिक्षण, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन परिसराच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळणार आहे. धाराशिवला अधिक सक्षम रेल्वे संपर्क मिळावा, ही जनतेची अनेक वर्षांची अपेक्षा आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे ती प्रत्यक्ष साकारण्याची कार्यवाही आता सुरू झाली आहे असे ते म्हणाले.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पासंदर्भातील माहिती दिली आहे. हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार असून, प्रवासी वाहतुकीबरोबरच कृषी व औद्योगिक मालवाहतुकीलाही मोठी चालना मिळेल. परिणामी मराठवाड्याच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.
डीपीआर तयार झाल्यानंतर राज्य सरकारसह विविध संबंधित यंत्रणांशी आवश्यक समन्वय साधला जाईल. त्यानंतर नीती आयोग, केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि इतर सक्षम प्राधिकरणांकडून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पाला अंतिम मान्यता देण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केल्याप्रमाणे, रेल्वे प्रकल्पांची मंजुरी ही विविध प्रशासकीय टप्प्यांतून पार पडणारी सातत्यपूर्ण प्रक्रिया असल्याने अंतिम मंजुरी व प्रत्यक्ष काम सुरू होण्याबाबत सध्या निश्चित कालमर्यादा सांगता येणार नाही. मात्र सर्वेक्षणाला मंजुरी मिळाल्याने हा प्रकल्प पुढील टप्प्यात पोहोचला असून, मराठवाड्याच्या विकासासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केले.












