धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेच्या एका शाळेत एका कुटुंबाने अतिक्रमण करून संसार थाटल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नगर परिषदेने पावले उचलताच ही शाळा अतिक्रमण मुक्त झाली आहे. शाळेतील. सर्व साहित्य, कबुतरखाना हे काढून घेण्यात आले आहे. स्थानिक नागरिक व नगरसेवक यांच्याशी चर्चा करून लवकरच इथे दुरुस्ती, रंगकाम व डागडुजी करून अंगणवाडी किंवा इतर शालेय कामासाठी या वास्तूचा उपयोग केला जाईल अशी माहिती नगराध्यक्षा नेहा राहुल काकडे यांनी दिली.
धाराशिव शहरातील सार्वजनिक रस्ते व सरकारी मालमत्ता यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्या म्हणाल्या की, सध्या एसआयआर मोहिमेचे काम सुरु असुन लवकरच शहरात अतिक्रमण काढण्याची व्यापक मोहीम राबवून अतिक्रमणमुक्त धाराशिव करू असा संकल्प बोलून दाखवला. अतिक्रमण व अनधिकृत बॅनरबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे.
नगर परिषद प्राथमिक उर्दू शाळा क्रमांक 5 मध्ये असलेल्या खोलीत एका कुटुंबाने संसार थाटला होता. शाळा बंद असल्याचे कारण देत तिथे घर, कबुतरखाना सुरु केला होता. नगरसेवक राहुल काकडे, शिक्षण सभापती प्रवीण माळी, सिद्धार्थ बनसोडे, आयाज उर्फ बबलु शेख, धनंजय पाटील यांच्यासह अधिकारी यांनी या शाळेला भेट दिली, तेव्हा तिथले वास्तव समोर आले. दैनिक समय सारथी वृत्तपत्राने ही बाब निदर्शनास आणुन पाठपुरावा केला होता.
2012-13 या साली या शाळेचे बांधकाम करण्यात आले होते त्यात 4-5 खोल्या, शौचालय बांधण्यात आले होते मात्र पटसंख्या कमी असल्याने शाळा बंद करण्यात आली. वापर होत नसल्याने तिथे एका कुटुंबाने घरासाठी वापर सुरु केला. SIR मोहिमेत प्रत्यक्ष घर तपासणी, भेटी दरम्यान हा गंभीर प्रकार समोर आला.
अतिक्रमण व त्यामागील अर्थकारण मोठे आहे, नगर परिषद, बांधकाम विभाग यातील काही जण याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करतात, त्याला राजकीय पाठबळ भर टाकणारे ठरते. आर्थिक लागेबांधे असल्याची चर्चा आहे. धाराशिव शहरात महावितरण, पंचायत समिती, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सेंट्रल बिल्डिंग, आठवडी बाजार, बार्शी नाका ते डीआयसी रोड, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद ते मुख्य रोड, बसस्थानक यासह अन्य भागात मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असुन हातगाडेसह काही ठिकाणी पत्र्याची दुकाने सुरु केली आहेत. रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कायम स्वरूपी दुकाने सुरु केली आहेत त्यामुळे वाहतूक, रहदारीस अडथळा निर्माण होत आहे तर शॉपिंग कॉम्प्लेक्स समोर अतिक्रमण असल्याने व्यापारी यांचे नुकसान होत आहे.











