उमरगा – समय सारथी
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होणार असुन उमरगा येथे महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले व महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार प्रवीण स्वामी यांच्यात थेट लढत होत आहे. चौगुले हे सलग 3 वेळेस आमदार राहिले आहेत तर स्वामी हे पहिल्यादा निवडणूक लढवीत आहेत त्यामुळे या लढतीकडे लक्ष लागले आहे.
उमरगा विधानसभा मतदार संघात शहरी भागात 47, ग्रामीण भागात 273 असे 321 मतदान केंद्र असुन 14 टेबलवर मतमोजणीचे 23 राऊंड होतील तर पोस्टल मतमोजणीचे 6 राऊंड होतील. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उमरगा येथून ज्ञानराज चौगुले हे 25 हजार 586 मतांनी विजयी होत हॅट्रिक केली होती त्यांना 86 हजार 773 मते पडली होती. 2024 विधानसभा निवडणुकीत 1 लाख 94 हजार 896 इतके मतदान झाले आहे.
उमरगा विधानसभा मतदार संघात 3 लाख 15 हजार 394 मतदारापैकी 1 लाख 94 हजार 896 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यात 93 हजार 103 महिला तर 1 लाख 1 हजार 787 पुरुषांनी मतदान केले, महिलांची टक्केवारी 62.33 तर पुरुषांचे 61.30 टक्के मतदान झाले. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद कळंब व भुम परंडा विधानसभा मतदार संघासाठी 1 हजार 523 मतदान केंद्रावर 20 नोव्हेंबरला मतदान झाले आहे, त्याची मतमोजणी सुरु आहे.