धाराशिव – समय सारथी
तुळजाभवानी भारताची ‘भारतमाता’ व महाराष्ट्राची ‘कुलस्वामिनी’ आहे असा उल्लेख असलेले पत्र तुळजाभवानी मंदीर संस्थानने पुजारी मंडळाला दिले होते मात्र पुजारी, भाविक व भक्त यांच्याकडुन टीका झाल्यानंतर मंदीर संस्थानने भुमिका बदलली असुन सुधारित पत्र काढले आहे. मंदीर संस्थानने सुधारित पत्र काढले असुन त्यात तुळजाभवानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी असल्याचे नमुद करीत ‘भारतमाता’ हा उल्लेख वगळला आहे. संस्थानने भुमिका बदलली असली तरी हा ‘उद्योग’ कोन व कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला ? हा प्रश्न अनुउत्तरीत आहे. भवानी तलवार 108 फुट मुर्तीबाबत मंदीर संस्थानने तिन्ही पुजारी मंडळाचा अभिप्राय मागितला आहे, त्या अनुषंगाने पत्र दिले आहे.14 जुनच्या पत्रात ‘भारतमाता’ उल्लेख केला मात्र पुन्हा 15 जुनला सुधारित पत्र काढले.

मंदीर संस्थान 15 जुन पत्रातील उल्लेख –
श्री तुळजाभवानी माता ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. श्री देविजच्या दर्शनासाठी आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडु व महाराष्ट्र राज्यासह लाखो भाविक कुलाचार व कुलधर्म करणेसाठी तुळजापूर तिर्थक्षेत्र येथे येत असतात.महाराष्ट्र शासनाने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या वतीने प्रस्तावित केलेल्या विकास आराखड्यास दिनांक 28 मे 2025 रोजी च्या शासन निर्णयानुसार 1865 कोटी रूपये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यान्वये रामदरा तलाव परिसरात श्री तुळजाभवानी आई छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देत असल्याचे 108 फुटी शिल्प उभारणे प्रस्तावित आहे. याअनुषंगाने धर्मशास्त्र तसेच रुढी परंपरेनुसार सदर श्रीदेविजींची छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देत असल्याचे शिल्प कसे असावे याबाबत कृपया, आपण आपला अभिप्राय कार्यालयास देण्याची विनंती तहसीलदार तथा मंदीर संस्थांनाचे प्रशासन व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांनी लेखी पत्रात केली आहे.
तुळजाभवानी ही ‘भारत माता’ असा इतिहासात कुठेही संदर्भ, उल्लेख नाही, असे असताना हे कोन केले ? हा शोध कोन लावला, कोणाची कल्पना व कोणाच्या सांगण्यावरून ? तुळजाभवानीची ओळख बदलण्याचा प्रयत्न कोन करत आहे? असे होत आहे असे सवाल निर्माण झाले आहेत. तुळजाभवानी ही ‘भारतमाता’ असा भावनीक मुद्दा पुढे करुन राजकीय स्वार्थ साधण्याचा डाव रचला असल्याचा आरोप होत आहे. काही जणासाठी हा ‘राजसत्ता’ मिळवण्याचा मार्ग असल्याचे बोलले जात आहे.