राजहट्ट, अतिक्रमण ठरवुन ‘बुलडोझर’ – अधिकारांचा वापर करणार, पालकमंत्री सरनाईक
धाराशिव – समय सारथी
तामलवाडी टोल नाक्याच्या शेजारी असलेली दुकाने, हॉटेल व सार्वजनिक शौचालय कारवाई करीत हटविण्याचे आदेश पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिले आहेत. ही दुकाने अतिक्रमण असुन त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी अशी त्यांची भुमिका आहे, तामलवाडी बरोबरच पारगाव, येडशी या भागातील टोल नाक्याजवळील दुकाने, हॉटेल व शौचालय काढली जाणार असुन अतिक्रमणावर ‘बुलडोझर’ चालविले जाणार आहे.
व्यापाऱ्यांनी व्यापार करायला हवा मात्र हाय वेवर स्वच्छता गृह नसावे. आयआरबीला जी जागा दिली आहे त्या जागेवर त्यांनी स्टॉल, दुकाने बांधायला हवीत. आयआरबीचे कार्यालय वातावरण कुलीत एसी आणि सर्वसामान्य जनता जी टोल पैसे देते त्यांना भर रस्त्याच्या कडेला शौचालय सुरु केले त्याचे ड्रेनेजचे पाणी कोणाच्याही शेतात सोडायचे हे असे चालणार नाही. जिल्हाधिकारी यांना सुचना दिल्या असुन जी कारवाई अपेक्षित आहे ती व्हायला पाहिजे. आयआरबीने दुकानाना जागा द्यायला पाहिजे.
काही लोकांनी सांगितले म्हणुन इथे शेत जमीन घेतली, तामलवाडी आता माझे गाव आहे. तुळजाभवानी हे माझे कुलदैवत आहे, मी आता पालकमंत्री म्हणुन इथे येत नाही तर वर्षातून 2 वेळेस येतो. याच भागात मी शेतीसाठी जमीन घेतली आहे. दर्शन घेण्यापुर्वी इथे परिवारासह थांबता येईल. तामलवाडी येथील काही शेतकऱ्यांनी मला निवेदने दिली आहेत त्यानुसार कारवाई करावी लागत असेल तर पालकमंत्री म्हणुन काही अधिकारांचा वापर करील असे सरनाईक म्हणाले.
पालकमंत्री सरनाईक यांची टोल नाक्याजवळ महामार्ग लागत 6 वेगवेगळ्या गटात 20 एकर जमीन आहे, त्यात भव्य दिव्य रिसॉर्टचे नियोजन असुन काम सुरु आहे. या रिसॉर्टची ‘शोभा’ टोल नाक्याजवळ असलेल्या दुकानामुळे व सार्वजनिक शौचालयामुळे कमी होणार असल्याने पालकमंत्री हा ‘राज हट्ट’ करीत असल्याचा आरोप होत आहे. अतिक्रमण ठरविण्याची कारवाई आगामी काळात सुरु होऊ शकते.
पालकमंत्री तथा परीवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी तामलवाडी टोलनाक्यावर अतिक्रमण मुक्तीची बैठक घेतली या बैठकीला जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्यासह अधिकारी, शिवसेना पदाधिकारी उपस्थितीत होते. पालकमंत्री यांच्या आदेशानंतर महसूल, आयआरबी व पोलिस प्रशासन कामाला लागले आहे. अधिकारी नियम व कायद्यातील तरतूदीचा शोध घेत असुन मोठा पेच निर्माण झाला आहे.
काही शासकीय नियमांचा आधार घेऊन टोल नाका परिसरात व काही शेतकऱ्याच्या जमिनीत असलेली दुकाने, टपरी ही अतिक्रमणाच्या नावाखाली काढून टाकण्याचा घाट रचला आहे. तामलवाडी येथील अनेक लोकांचा रोजी रोटी, रोजगार व व्यवसाय या दुकानावर अवलंबून आहे मात्र त्यावर ‘बुलडोजर’ चालविण्याची तयारी सुरु केली आहे. एकदरीत पालकमंत्री यांची ही भुमिका आगामी काळात ‘वादग्रस्त’ ठरणार असल्याचे दिसते.











