1 हजार 771 एकरावर सुरु होणार उद्योग – नव उद्योजकांना संंधी तर तरुणांना रोजगार मिळणार
धाराशिव – समय सारथी
राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले असुन भुम, वाशी व परंडा येथे एमआयडीसीसाठी जागा मंजुर करण्यात आली आहे. या 3 ठिकाणी 716 हेक्टर म्हणजे 1 हजार 771 एकर क्षेत्र मंजुर करण्यात आले असुन यामुळे या भागात आता उदयोग सुरु होणार आहेत. एमआयडीसी विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे यांनी मंजुरी बाबतचे पत्र पालकमंत्री डॉ सावंत यांना पाठविले आहे. एमआयडीसीमध्ये स्थानिक उद्योजक तयार व्हावे व त्यांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरु असुन मुंबई, पुणे येथील उद्योजक यांच्याशी बोलणी सुरु आहे. स्थानिकांना रोजगार व त्यांना उद्योग सुरु करतात येणार आहेत.
धाराशिव हा आकांक्षित जिल्हा असुन या ठिकाणी विकास व विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी नेहमी प्रयत्न केले आहेत. धाराशिव जिल्ह्यात ’न भुतो न भविष्यती’ अश्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत त्यात स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, रुग्णालय श्रेणीवर्धन व नवनवीन मशीन उपलब्ध झाल्या आहेत. मराठवाड्याचे हक्काचे पाणी अवघ्या काही महिन्यात भुम परंडा या भागात येणार आहे. पाणी येणार असल्याने सिंचन क्षेत्र वाढणार आहे त्याच बरोबर आता उद्योग क्षेत्र वाढावे यासाठी पालकमंत्री डॉ सावंत यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.
वाशी येथे 451.44 हेक्टर क्षेत्र, भुम येथे अतिरिक्त 134.15 हेक्टर व परंडा येथे 131.40 हेक्टर क्षेत्र मंजुर करण्यात आले आहे या ठिकाणी नवीन तरुण उद्योजक यांना उद्योग सुरु करण्याची संधी मिळणार आहे. भुम परंडा वाशी या भागात दुध, खवा व इतर शेती पुरक उद्योग सुरु करण्यावर भर असुन पाणी आल्यानंतर सिंचन क्षेत्र वाढणार आहे त्यावेळी शेतीशी निगडीत अनेक धान्य, फळ प्रक्रिया उद्योग सुरु करता येऊ शकतील. परंडा तालुका हा ज्वारीचे कोठार आहे, या भागात अनेक कृषी पुरक उद्योग सुरु करण्यावर आगामी काळात भर असेल, उद्योग क्षेत्रामुळे रोजगार उपलब्ध होणार आहे, असे पालकमंत्री डॉ सावंत म्हणाले.
शेतकर्यांसाठी फार्मिंग एअरपोर्टची मंत्री डॉ सावंत यांची संकल्पना
शेतकर्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी देशभर फार्मिंग एअरपोर्टची संकल्पना पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी नुकतीच मांडली आहे, यासाठी ते केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत.देशात सर्वप्रथम ही योजना महाराष्ट्रात राबविण्याचा संकल्प ही त्यांनी केला आहे. फार्मिंग एअरपोर्ट म्हणजे शेतकर्यांसाठी एअरपोर्ट तयार करणे, ही माझी संकलपना असुन ही भारतभर राबविन्यासाठी पंतप्रधान यांना लेखी पत्र व अहवाल पाठवले आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक असे शेतकरी यांच्यासाठी एअरपोर्ट सुरु केले जाईल त्यातून इथले धान्य, दुध 24 तासात जगातील मार्केटमध्ये पोहचले व शेतकर्यांना चांगला भाव मिळेल. गोडाऊन, कोल्ड स्टोरेज असे तयार करुन रोजगार उपलब्ध होणार आहे.कांदा, सोयाबीन भाव कमी जास्त होतात त्यामुळे जेव्हा भाव जास्त असतात तेव्हा धान्य व इतर वस्तू इतर ठिकाणी विकल्या तर आर्थिक प्रगती होईल. फार्मिंग एअरपोर्ट व इतर खर्च जरी गेला तरी शेतकर्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. मला मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शब्द दिला आहे की महाराष्ट्रात प्रथम फार्मिंग एअरपोर्ट सुरु करणार आहेत. त्याचा सावंत पाठपुरावा करीत आहेत.