धाराशिव – समय सारथी
विधान परिषदेवर धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी यांना संधी द्या अशी मागणी धाराशिव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांतुन होत आहे. धाराशिव जिल्हा परिषद, नगर परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्हाध्यक्ष कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुतीने अभूतपूर्व यश मिळवीत सत्ता स्थापन केली. पक्ष संघटन, तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क, दांडगा अनुभव ह्या त्यांच्या जमेच्या बाजु आहेत. राजकीय क्षेत्रासोबतच त्यांनी सिद्धिविनायक परिवाराच्या माध्यमातून बँकिंग, कारखाना यासह सहकार क्षेत्रात उद्योग व रोजगार निर्मितीचे मोठे काम केले आहे.
स्थानिक राजकारण व आरोप प्रत्यारोपात न अडकता कुलकर्णी यांनी विकासात्मक दृष्टीकोन ठेवून काम केले. संघटनात्मक बांधणी, बूथ पातळीवरील तयारी, तसेच विकासाभिमुख अजेंडा घेऊन भाजपा कार्यकर्ते यांना सक्रीय केले. महायुतीच्या घटक पक्षात समन्व्य ठेवत त्यांनी अनेक विषय व मुद्दे मार्गी लावले. सुजितसिंह ठाकूर यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे.
धाराशिव जिल्ह्यातील 17 मंडळांमध्ये एकाच दिवशी तब्बल 1 हजार 20 पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणीत नियुक्ती करण्यात आली त्यामुळे यश आले. ‘संकल्प ते सिद्धी’ यासह अनेक उपक्रम राबविले. शांत,संयमी व पक्षातील सर्वसमावेशक नेतृत्व म्हणुन त्यांच्याकडे पाहिले जाते. विधानसभा प्रदेश निवडणूक संचलन मराठवाडा समितीत त्यांचा समावेश होता. सहकार आघाडी राज्य सहसंयोजक सह अनेक पदावर काम करीत जबाबदारी सक्षमपणे पार पाडली.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आल्या असुन 12 मे रोजी मतदान होणार आहे. उद्धव ठाकरे (शिवसेना उबाठा) नीलम गोहे (शिवसेना) शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट) अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट) गोपीचंद पडळकर (भाजप) रणजितसिंह मोहिते पाटील (भाजप) राजेश राठोड (काँग्रेस) प्रवीण दटके (भाजप) व रमेश कराड (भाजप) यांची मुदत संपणार आहे.
विधान परिषदेचा 1 आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार निवडून येऊ शकतो.
भाजपच्या वाट्याला 5, शिंदेसेनेला 2, राष्ट्रवादी (अजित पवाराला 1 आणि महाविकास आघाडीला एक जागा मिळेल, असे विधानसभेतील संख्याबळानुसार चित्र आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) कडे अधिकची 13 मते आहेत. त्यामुळे त्यांनी दुसरी जागा लढवावी, असे महायुतीने ठरवले तर निवडणूक बिनविरोध होणार नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघामध्ये विधान परिषद निवडणूक होऊ शकते त्यात सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली- सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा चंद्रपूर गडचिरोली, अमरावती. धाराशिव लातूर-बीड, परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर-जालना, नागपूर यांचा समावेश आहे.











