धाराशिव – समय सारथी
धाराशिव तालुक्यातील बावी गावात ऑनलाइन रमी व गेमच्या विळख्यात अडकलेल्या एका युवकाने पत्नी व दोन वर्षांच्या मुलाला विष पाजले आणि नंतर स्वतःही आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. मुलाचा जीव घेल्या प्रकरणी पिता असलेल्या लक्ष्मण जाधव याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लक्ष्मण मारुती जाधव (वय 28) हा ऑनलाईन गेमच्या व्यसनात इतका अडकला होता की त्याने आपल्या जमिनी व प्लॉट विकून पैसे उधळले. यामुळे तो मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला होता. नैराश्याच्या गर्तेत गेल्यानंतर त्याने पत्नी तेजस्विनी (वय 23) हिच्यासोबत आत्महत्येचा निर्णय घेतला. 15 जूनच्या रात्री ते 16 जून सकाळी दरम्यान, या दोघांनी विषारी औषध प्राशन केलं. त्यानंतर लक्ष्मणने आपल्या दोन वर्षांच्या मुलाला, शिवांश लक्ष्मण जाधव यालाही ‘टफगोर’ नावाचे विष पाजून त्याचा खून केला. पत्नी व मुलगा मरण पावल्याची खात्री झाल्यानंतर लक्ष्मणने घरातील लोखंडी अडुळ्याला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
पोलीस अधीक्षक रितु खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी तपास केला. पोलीस उपनिरीक्षक सी.एस. बनसोडे यांनी चौकशीनंतर धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 103(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बावी गावात शोककळा पसरली असून, ऑनलाईन गेमच्या नशेमुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.