धाराशिव – समय सारथी
तुळजाभवानी देवी छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देतानाची 108 फूट उंच मुर्ती तुळजापूर येथील रामदरा येथे उभारण्यात येणार आहे. या मूर्तीच्या स्वरूपासह तुळजाभवानी विकास आराखडा बाबतीत पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी 17 जुन रोजी मुंबई मंत्रालयात बैठक बोलावली आहे. पालकमंत्री यांच्या अध्यक्षते खालील या बैठकीला मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, खासदार, सर्व आमदार व जिल्हा स्तरीय समितीचे सदस्य उपस्थितीत राहणार आहेत. तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देतानाची मुर्ती द्विभुजा (पारंपरिक) असावी असे पालकमंत्री यांनी सांगितले, मंदीर संस्थानने जो आराखडा बनवला आहे त्यात मुर्ती अष्टभुजा दाखवली आहे. मुर्ती पुर्व दिशेला असावी अशी मागणी आहे.
आमदार तथा मंदीर विश्वस्त राणाजगजीतसिंह पाटील यांनी सांगितले आहे की, शिल्पासाठी कला संचालनालय आणि पुरातत्व विभाग यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देशभरातील नामवंत शिल्पकारांना शिल्पाचे नमुने सादर करण्याबाबत कला संचालनालयाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अडीच ते तीन फूट आकाराचे शिल्पनमुने सादर करण्यात येणार आहेत. त्यातून उत्कृष्ट पाच शिल्प नमुन्याची निवड होणार आहे. या पाच सर्वोत्तम शिल्पापैकी सर्वोत्कृष्ट शिल्प निवडल्यानंतर प्रत्यक्ष शिल्प उभारणीस प्रारंभ केला जाईल.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या मूर्तीचे “द्विभुजा स्वरूपात असावे” असे ठाम मत व्यक्त करत भावनिक मुद्दा अधोरेखित केला असताना, भाजप आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांनी शिल्पकारांकडून अष्टभुजा मूर्तीचे शिल्प नमुने मागवले आहेत.”श्रद्धा आणि मूळ रूप महत्त्वाचे आहे असे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.कोणाच्याही भावना न दुखावता मूर्तीचे अंतिम स्वरूप ठरवले जाईल असे ते म्हणाले.
“तुळजाभवानी देवीची मूर्ती ही मूळ रूपातीलच असावी. मी लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार अर्पण करताना जी द्विभुजा तुळजाभवानी पाहत आलो आहे, तीच श्रद्धेची मूर्ती माझ्या मनात आहे. त्यामुळे ही मूर्ती द्विभुजा असावी ही माझी वैयक्तिक व भाविकांची सुद्धा भावना आहे.” “ज्या मूर्तीप्रती भक्तांचा भावनिक जिव्हाळा आहे, त्याला कुठेही छेद देता कामा नये. कुणा एका व्यक्तीच्या सांगण्यावरून मूर्तीचे स्वरूप ठरवणे योग्य ठरणार नाही. यासाठीच 17 जून रोजी मी विशेष बैठक बोलावली आहे, असे ते म्हणाले.